तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी : गावकऱ्यांतून संताप
कोगनोळी : आप्पाचीवाडी मत्तीवडे मार्गावरील कॅनॉल रस्त्यावरील पुलाचे काम रखडल्याने प्रवासी व नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पूल बांधकामाकडे लोकप्रतिनिधींसह संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने काम रखडल्याची चर्चा नागरिकांतून ऐकावयास मिळत आहे. पूल बांधकामाकडे दुर्लक्ष झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण झाले असून कॅनॉलपर्यंत येऊन दोन्ही बाजूने काम थांबले आहे. कॅनॉलवर पूल तयार करण्यासाठी ग्रामस्थांतर्फे अनेकवेळा लेखी निवेदने देऊनही दुर्लक्ष झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जाणीवपूर्वक या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.
पुलाचे काम रखडल्याने वाहनधारकांसह नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पुलाच्या बांधकामाचे केवळ उद्घाटन झाले. पण अद्याप पूल निर्मिती झालेली नाही. सुळगाव मत्तीवडे ही गावे आप्पाचीवाडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येत असून या गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असले तरी कॅनॉलवर पूल नसल्याने ही गावे एकमेकांना जोडली गेलेली नाहीत.
पुलाच्या कामाकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन काम पूर्ण केल्यास दोन्ही गावांना ये-जा करण्यासाठी मदत होणार आहे. त्याचबरोबर निपाणी आगाराची बस आप्पाचीवाडीमार्गे सुळगाव, मत्तीवडे अशी सुरू करून विद्यार्थ्यांची गैरसोयही दूर होणार आहे. सध्या विद्यार्थ्यांना पायी प्रवास करावा लागत असून अधिक वेळ जात असल्याने वेळेत पोहोचता येत नसल्याने शैक्षणिक नुकसानही होत आहे. लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन त्वरित पुलाचे काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे.