निपाणी (वार्ता) : स्वयंपाक गॅसचा अचानक स्फोट होऊन एक जण जखमी तर लाखाचे नुकसान झाल्याची घटना येथे शुक्रवारी (ता.३०) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. युवराज देसाई असे या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. यावेळी तब्बल सव्वा तास अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
याबाबत अग्निशामक दलाकडून मिळालेली अधिक माहिती अशी, यमगरणी येथील युवराज देसाई यांच्या घरी स्वयंपाक करत असताना अचानक गॅसने पेट घेतला. त्यामुळे स्फोट होऊन किचन रूम मधील संसारउपयोगी साहित्य आणि अन्नधान्य जळून खाक झाले. स्फोट होताच नागरिकांनी तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण केले. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी सलग सव्वा तास प्रयत्न केले. या जवानांच्या तात्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर गॅस वितरकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणे केली. ही आग विझवण्यासाठी ए.आय. रुद्रगौडर, के. एम. कुरी, डी. एल. कोरे, जे. एस. कांबळे, बी. एस. देवरुशी, एस. एच. कट्टी यांच्यासह अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रयत्न केले.
Belgaum Varta Belgaum Varta