प्राणलिंग स्वामी : निपाणीत हृदयरोग तपासणी शिबिर
निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात चमचमीत खाण्याच्या नादामध्ये आरोग्याचे नुकसान होत आहे. परिणामी सर्वच वयोगटांमध्ये हृदयरोग्यांची संख्या वाढत चालली आहे. हे टाळण्यासाठी आहारावर नियंत्रण आणि दररोज व्यायाम, योगासन आवश्यक आहे. पर्यावरणाचे रक्षण करत नैसर्गिक जीवन पद्धतीचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. जीवन पद्धतीत बदल झाल्याने मानवी आरोग्य धोक्यात आले आहे, असे मत समाधी मठातील प्राणलिंग स्वामी यांनी व्यक्त केले.
कणेरी येथील सिद्धगिरी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर आणि निपाणीमधील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेतर्फे रविवारी(ता.९) शहर व परिसरातील रुग्णांसाठी मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून स्वामी बोलत होते. महात्मा बसवेश्वर संस्थेच्या रौप्यमहोत्सवी सभागृहात हे शिबिर पार पडले. त्याला परिसरातील रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन आणि रोपाला पाणी घालून शिबिराचे उद्घाटन झाले.पार पडले. संचालक श्रीकांत परमने यांनी स्वागत केले.
संस्थापक अध्यक्ष डॉ. सी. बी. कुरबेट्टी यांनी, अलीकडच्या काळात विविध प्रकारचे आजार वाढले आहेत. अशावेळी प्राथमिक टप्प्यात तात्काळ उपचार घेतल्यानंतर कोणतेही मोठे आजार टाळता येतात. शारीरिक तंदुरुस्तीसाठी व्यायाम, योगासने, खेळ आवश्यक असून अतिविचार टाळण्याची गरज आहे. भौतिक सुखापेक्षा मानसिक समाधान महत्त्वाचे आहे. उतार वयात वेळोवेळी शारीरिक तपासणी करून घ्यावी. महात्मा बसवेश्वर संस्थेने गेल्या ३० वर्षात समाजोपयोगी कामांवर भर दिला असून यापुढेही सेवाभावी वृत्ती जोपासण्यात संस्था कमी पडणार नसल्याची ग्वाही दिली.
कणेरी मठाचे हृदयरोग तज्ञ डॉ. शंतनु पालकर यांनी मठातर्फे राबविल्या जात असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. धर्मादाय हॉस्पिटल असणाऱ्या कणेरी येथे अल्प दरात उपचार सुविधा पुरविल्या जात असून भविष्यात या सुविधाही मोफत देण्याचे नियोजन आहे. ३१ जुलैपर्यंत कणेरी हॉस्पिटलमध्ये मोफत एन्जिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी केली जात असून याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर मान्यवरांचा सत्कार झाला.
कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश शेट्टी, संचालक प्रताप पट्टणशेट्टी, श्रीकांत परमणे, महेश बागेवाड़ी, सदानंद दुमाले, प्रताप मेत्राणी, अशोक लिगाडे, पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी, सदाशीव धनगर, दिनेश पाटील, मुख्य शाखा व्यवस्थापक शशिकांत आदन्नावर व कर्मचारी उपस्थित होते. सुजाता जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर सुरज घोडके यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta