
सहकारत्न रावसाहेब पाटील; कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात शाखांचा विस्तार
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्था ही राज्यात आदर्श संस्था ठरली आहे. सेवा, विश्वास आणि प्रगतीला पात्र ठरलेल्या या संस्थेने राज्यातील बेळगाव, हुबळी धारवाड व बागलकोट जिल्ह्यात मुख्य शाखेसह ५४ शाखांद्वारे कार्य करीत आहे. ही संस्था मल्टीस्टेट व्हावी, अशी मागणी होती. संस्थेचा दर्जा व प्रगतीचा आढावा घेत केंद्र सरकारने श्री अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्थेला मल्टीस्टेटचा दर्जा दिल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, सहकाररत्न रावसाहेब पाटील यांनी दिली.
बोरगाव येथे आयोजित बैठकीत बोलताना ते म्हणाले, बोरगाव सह परिसरातील गरजूंना वेळेत पत पुरवठा होऊन आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी १९९० साली अरिहंत संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला ८७० सभासद असलेल्या या संस्थेत ४ लाख ३५ हजार रुपयांचे भाग भांडवल होते. तर ५ लाख २५ हजार रुपयांच्या ठेवी होत्या. पहिल्याच वर्षी सभासदांना ८ लाख ४५ हजारांचे कर्ज देऊन सभासदांचे हित जोपासण्याचे कार्य केले आहे. अल्पावधीतच संस्थेने आपली वाटचाल प्रगतीच्या दिशेने ठेवून सर्वांच्या विश्वासात पात्र राहिली. निस्वार्थी, प्रामाणिक व पारदर्शी व्यवहार करीत असल्याने ही संस्था ‘मल्टीस्टेट’ व्हावी अशी कर्नाटक राज्यासह जवळच्या महाराष्ट्र राज्यातील अनेकांची मागणी होती .या मागणीची दखल घेत वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबत ठराव करण्यात आला. संस्थेचा दर्जा व प्रगतीचा आढावा घेत कर्नाटक शासनाने मल्टीस्टेटला मंजुरी दिली. कर्नाटका बरोबरच महाराष्ट्र व केंद्र शासनाकडून ही मंजुरी मिळाली. कर्नाटक, महाराष्ट्र व दिल्ली येथील सहकार निबंधकाच्या विशेष सहकार्यामुळे अरिहंत संस्थेला मल्टीस्टेटचा दर्जा मिळाला. लवकरच कोल्हापूर व सांगली येथे शाखा विस्तारित करणार असल्याचे माहिती रावसाहेब पाटील यांनी दिली.
कर्जदारांना २० लाखापर्यंत विमा सुविधा, तसेच कर्मचाऱ्यांना २५ लाखापर्यंत विमा सुविधा देऊन सभासद व कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. सध्या संस्थेत १३,८७० सभासद असून ५ कोटी ५१ लाखांचे भाग भांडवल आहे.
६७ कोटी ६३ लाखांचे निधी असून संस्थेने ११०० कोटींचे ठेव उद्दिष्ट पूर्ण केले असून ११०४ कोटींच्या ठेवी आहेत. १७९ कोटींची गुंतवणूक करून चालू आर्थिक वर्षात ९३८ कोटींचे कर्ज देऊन ९ कोटी ७२ लाखांचे नफा मिळवला आहे. निस्वार्थी संचालक मंडळ व प्रामाणिक कर्मचारी सर्व सभासद, शेतकरी, हितचिंतक, ठेवीदार, कर्जदार यांच्या सहकार्यामुळे संस्थेची प्रगती होत असल्याचे शेवटी रावसाहेब पाटील यांनी सांगितले.
प्रारंभी संस्थेचे जनरल मॅनेंजर अशोक बंकापुरे यांनी स्वागत केले.
बैठकीस संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष शेट्टी, कार्याध्यक्ष व विद्यमान संचालक अभिनंदन पाटील, जयगोंडा पाटील, अभयकुमार करोले, जयपाल नागावे, अप्पासाहेब कडोले, पिरगोंडा पाटील, भुजगोंडा पाटील, शरदकुमार लडगे, सतीश पाटील, बाबासाहेब अफराज, श्रीकांत वसवाडे, निर्मला बल्लोळे, विमल पाटील, अजित कांबळे, सहाय्यक जनरल मॅनेंजर शांतिनाथ तेरदाळे, अभिनंदन बेनाडे यांच्यासह संचालक व कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta