तालुक्यातील निम्मा भाग तहानलेलाच; शेतकऱ्यांचे डोळे मोठ्या पावसाकडे
निपाणी (वार्ता) : मोसमी पावसाला सुरवात होऊन एक महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला, तरीही निपाणी तालुक्यात निम्म्या भागातील शेत जमीन तहानलेलीच आहे. परिणामी पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. शेतकरी बांधवांनी मे अखेरीस मशागत करून शेते पेरणीसाठी तयार करून ठेवली. पहिल्या तीनही नक्षत्रांत कमी प्रमाणात पाऊस झाला. काही शेतकऱ्यांनी या रिमझिम पावसावरच पेरणी केली. मात्र, नदी ओढ्याला एकही पूर आला नाही. त्यामुळे पाऊस फक्त डोळ्यांतच, अशी स्थिती आहे.
एप्रिल मेच्या तापलेल्या उन्हाने शिलकीच्या पाण्यावर थोडा-फार हिरवा चारा केला होता, तोही आता संपला आहे. गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसाने रब्बीच्या पिकावर विपरीत परिणाम झाल्याने जनावरांना घालण्यासाठी वैरण नाही. विहिरींचे व कूपनलिकांचे पाणीही वाढले नाही. चाऱ्याबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. आता मोठा पाऊस आला तरीही यंदा उत्पन्नात घट येणार हे निश्चित आहे.
मॉन्सून सुरू होऊन महिना उलटून गेला तरी तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे दुभत्या जनावरांना हिरव्या चाऱ्याची अडचण निर्माण झाली आहे. या चाऱ्याचेही दर वाढल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतातील चारा संपल्याने व दुधालाही दर कमी झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
—————————————————————-
राज्य सरकारने अगोदरच दुधाचे दर कमी केलेले आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक टंचाईत आहेत. पशुखाद्य, तसेच चाऱ्याचे दर वाढलेले आहेत. त्या तुलनेत दुधाचे भाव कमी झालेले आहेत. त्यामुळे शेतकरी अडवणीत सापडला आहे.
——————————————————————–
यंदाच्या हंगामातील पाऊस
‘यंदाच्या पावसाळी हंगामातील तीन नक्षत्रातील पावसाची सांगता झाली आहे. गुरुवारपासून (ता. २० ) पुनर्वसू नक्षत्रातील पावसाचा हंगाम सुरू होणार आहे. मार्चमध्ये १६.८ मि.मी.,एप्रिलमध्ये ११.८, मे मध्ये ५६.४ तर जून मध्ये ३० मि.मी. पाऊस झाला आहे.गेल्या १५ दिवसात ५७.२२ मि.मी. पावसाची नोंद येथील कृषी संशोधनातील पर्जन्यमापकावर झाली आहे.
——————————————————————–
‘यंदा रयत संपर्क केंद्राने मागविलेल्या एकूण ११० टन सोयाबीन बियाणांपैकी १०२ टन तर ४ क्विटल ताग बियाणाची उचल झाली आहे. शिवारातील एकूण उत्पादित क्षेत्रापैकी ४० ते ५० टक्के क्षेत्रावर पेरणीकामे झाली आहेत. खरिपाचा हंगाम जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत साधता येतो. खऱ्या अर्थाने वातावरण निमिर्तीसाठी सध्या दमदार पावसाची गरज आहे.’
– दीपक कौजलगी, प्रभारी कृषी अधिकारी, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta