खरीप हंगामाला चैतन्य; हिरवी स्वप्ने डोळ्यात साठवून शेती कामांची वाढली लगबग
निपाणी (वार्ता) : यंदा उन्हाळ्यामध्ये एकही वळीव पाऊस झाला नाही. त्यानंतर जून महिन्यात पावसाने सर्वांनाच संभ्रमात टाकले होते. मृग सरी कोसळून पुन्हा लुप्त झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. पण आता पुन्हा निपाणी शहर आणि ग्रामीण भागात पावसाची कृपा झाली असून दोन दिवसापासून पावसाच्या दमदार सरी कोसळू लागल्या आहेत. त्यामुळे भविष्याची हिरवी स्वप्ने डोळ्यांत साठवून शेतकरी शेतीकामांत मग्न झाल्याचे चित्र निपाणी परिसरात दिसत आहे.
शेतकरी दरवर्षी मृग नक्षत्र सुरू होताच खरीप हंगामाच्या पेरणीसाठी सज्ज होत असतात. यंदा मृग नक्षत्रात पावसाने जेमतेम हजेरी लावली. आर्द्रा नक्षत्राच्या मुहूर्ताला तीन ते चार दिवस पावसाने हजेरी दिली आणि पाऊस पुन्हा बेपत्ता झाला होता. दमदार पावसाच्या ओढीने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्यांना सुरुवात करण्याची तयारी सुरू केली. पावसाने त्यांच्या आशेवर पुन्हा पाणी फेरले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन, मूग, भुईमूगाच्या पेरण्या रखडल्या होत्या. यंदा मान्सून वेळीच दाखल होण्याचे भाकित नेहमीप्रमाणे खोटेच ठरले. पहिल्या पावसाचा पहिला पंधरवडा म्हणजे मृग नक्षत्र असतो. पारंपरिक पद्धतीने सोयाबीन पेरणी केली जाते; पण मृगात पावसाने तोंड दाखवले नाही. आर्द्रा नक्षत्राच्या प्रारंभी जून महिन्याच्या अखेरी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आता काही दिवसांपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. काही शेतकऱ्यांनी पावसाच्या लहरी स्वभावाचा अंदाज घेत सोयाबीनची टोकननी केली आहे. मात्र बरेच शेतकरी अजूनही पेरणीच्या तयारीत आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी बी- बियाणे खरेदी केली आहेत. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन पिक उगवलेसुद्धा आहे. पण आता त्याच्या वाढीसाठी पावसाची गरज होती. पण दोन दिवसापासून पाऊस सुरू झाल्याने आता उगवण झालेल्या पिकाची चिंता आहे.
कोकण फाटा शहर या भागात होणाऱ्या पावसामुळे ओढ्यांना पाणी आले असून वेदगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे.
——————————————————————-
काही दिवसांची उसंत घेऊन पावसाच्या सरी बरसू लागल्या तरी हा पाऊस अजिबात दमदार वाटत नाही. अगदीच कमकुवत असल्यासारखा रिमझिम बरसत आहे. यंदा पावसाळ्याला काहीच जोर नसल्याचे दिसून येत आहे. मध्येच चार थेंब सांडून पाऊस निघून जातो. कधी दिवसभर बरसतो पण बिघडलेल्या शॉवरमधून थोडेसेच पाणी गळावे, तसा पाऊस पडत आहे. असा पाऊस खरीपातील सोयाबीन पिकासाठी फारसा उपयुक्त नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून पावसाने दमदार बरसावे, अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta