सर्व्हर डाऊनचा फटका; दिवसभर नागरिकांच्या रांगा
निपाणी (वार्ता) : गृहलक्ष्मी आणि अन्नभाग्य योजनेला प्रारंभ झाला असून गावागावांतून नोंदणीकरण आणि पासबुक काढण्यासाठी गर्दी होत आहे. ग्रामपंचायत कार्यालयातील बापूजी सेवा केंद्र आणि ग्रामवन मधून गर्दी होत आहे. परंतु, सर्व्हर डाऊनचा फटका अनेकठिकाणी बसत आहे. त्यामुळे दिवसभर बँका आणि इतर ठिकाणी रांगा लागल्या आहेत.
काँग्रेसने विधानसभा निवडणुकीपूर्वी गृहलक्ष्मी योजना जारी करण्याचे आश्वासन दिले त्यानुसार गृहिणीला प्रति महिना २ हजार देण्यात येणार नोंदणीला प्रारंभ करण्यात आला आहे.
तालुक्यातील बहुतांश ग्रा. पं. मधून त्याची सोय करण्यात आली आहे.त्यामुळे महिलांची धावपळ सुरू झाली आहे. पात्र लाभार्थ्यांना सेवा सिंधूकडून नोंदणीसाठी संदेश येत आहे. त्यावर स्थळ आणि वेळेचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार उपस्थित राहून नोंदणी करण्यात येत आहे. महिलांसाठी याचा फायदा झाला आहे. शिधापत्रिका, मोबाईल क्रमांक, आधार, पतीचे आधार, बँक पासबुकची मागणी करण्यात येत आहे. मोबाईल क्रमांकावर ओटीपी येत असून त्वरित योजना मंजुरी पत्र मिळत आहे. यामुळे महिलांना सोयीस्कर ठरले आहे.
या योजनेसाठी प्रत्येक व्यक्तीसाठी बापूजी सेवा केंद्र, ग्रामवन केंद्रावर मोफत नोंदणीची सोय आली आहे. सरकारकडून एका व्यक्तीच्या नोंदणीसाठी १२ रुपये अनुदान ग्रामवन चालकांना देण्यात येणार आहे. परंतु अनेक गावांतून ग्रामवन केंद्रांतून पैसे उकळले जात असल्याचा आरोप केला जात आहे. काही राजकीय कार्यकर्त्यांनीही कागदपत्रे जमा करून नोंदणी करणार असल्याचे सांगत पैसे उकळण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. यावर कारवाई करण्याची गरज आहे.
Belgaum Varta Belgaum Varta