Monday , December 8 2025
Breaking News

समाजातील गरजा शोधून सेवा पुरवा

Spread the love

 

माजी प्रांतपाल डॉ. व्यंकटेश मेतान; रोटरी, इनरव्हील पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ

निपाणी (वार्ता) : सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय पर्यावरण अशा विविध क्षेत्रात ११८ वर्षांपासून संपूर्ण जगात रोटरी ही एकमेव सामाजिक संस्था कार्यरत आहे आहे. युनोमध्ये मतदानाचा अधिकार असलेल्या रोटरी संस्थेत काम करणाऱ्या प्रत्येक सदस्याने सेवाभावी वृत्ती जोपासणे आवश्यक आहे. नूतन पदाधिकाऱ्यांनी समाजात आवश्यक सेवा पुरवावी, असे आवाहन रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. व्यंकटेश मेतान यांनी केले.
निपाणी रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी प्रवीण उर्फ विरु तारळे, सचिवपदी राजेश तिळवे तर खजिनदार म्हणून श्रीमंधर होनवाडे यांची निवड झाली. तसेच इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी श्रेया खेडेकर, सचिवपदी अर्चना बुर्जी आणि खजिनदारपदी दिव्या दिवाणी यांची निवड झाली. या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ रोटरीच्या हॉलमध्ये पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
गजेंद्र तारळे, डॉ. अरमानी, वर्षा नंदर्गी, वैशाली शहा यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी मेतान यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शपथ दिली.
इनरव्हीलच्या जिल्हा खजिनदार वसुंधरा कोले म्हणाल्या, गेल्या शंभर वर्षात इनरव्हील क्लबने महिलांना सामाजिक सेवेसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेशी जोडलेल्या इनरव्हील क्लबकडून सध्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत समाज साक्षर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर प्रदूषण नियंत्रण, लिंग समानता, अन्नाचा अपव्यय रोखणे यावर प्रामुख्याने भर देण्यात आला असल्याचे सांगितले. सहाय्यक प्रांतपाल अशोक नाईक, मकरंद कुलकर्णी आनंद सोलापूरकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
नूतन अध्यक्ष प्रवीण तारळे यांनी, रोटरीमध्ये काम करणे ही प्रत्येकासाठी अभिमानास्पद बाब आहे. अशा रोटरीचा अध्यक्ष म्हणून मिळालेल्या कालावधीत आपण निपाणी परिसराच्या सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण विकासात भर घालण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. इनरव्हीलच्या अध्यक्षा श्रेया खेडेकर यांनी, सर्व सहकारी सदस्यांना विश्वासात घेऊन महिलांचे आरोग्य, पर्यावरण व करिअर गायडन्स वर अधिक काम करण्याची इच्छा आहे. याशिवाय समाज उपयोगी उपक्रम राबवू, असे सांगितले.
कार्यक्रमास गोकुळचे संचालक कर्णसिंह गायकवाड, माजी अध्यक्ष दिलीप पठाडे, आशिष कुरबेट्टी, माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, डॉ. अरुण पाटील, नगरसेवक राजु गुंदेशा, वृषाली तारळे यांच्यासह रोटरी व इनरव्हील क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते. संजय नंदर्गी व वैशाली पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर सचिव राजेश तिळवे यांनी आभार मानले.
——————————————————————-
डॉ.कुरबेट्टी दाम्पत्याची आठ लाखाची देणगी
वैद्यकीय सेवा सहकार आणि सामाजिक कार्यक्षेत्रात डॉ. सी. बी. कुरबेट्टी हे निरंतरपणे कार्यरत आहेत. त्यांच्यासह त्यांच्या सुविद्य पत्नी पुष्पा कुरबेट्टी यांनी निपाणी रोटरी क्लबच्या कार्याला ८ लाख रुपयांची देणगी दिली. त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

इचलकरंजी येथील युवकाचा निपाणी जवळ खून

Spread the love  धारदार शस्त्राचा वापर ; मृतदेह टाकला ओढ्यात निपाणी (वार्ता) : इचलकरंजी येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *