दरवाढीचा ग्राहकांना फटका : ग्राहकांची मागणी कमी
निपाणी (वार्ता) : टोमॅटोचे दर आकाशाला भिडल्याने ग्राहकांनी भाजी खरेदी करताना टोमॅटोला सुट्टी दिली आहे. टोमॅटोचे दर ७० ते ९० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचल्याने हॉटेलच्या मेन्यूतील पदार्थांमधून टोमॅटो सूप गायब झाले आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्यांची आवडती पावभाजीही आता टोमॅटोविनाच खावी लागत आहे. निपाणीतील अनेक हॉटेल व पावभाजीच्या ठेल्यांवर टोमॅटोविनाच पावभाजी दिली जात आहे.
टोमॅटोचा वापर हा खाद्यपदार्थातील महत्त्वाचा घटक आहे. हातगाडी व हॉकर्स स्वरुपातील पावभाजी किंवा अंडाबुर्जी विक्रेत्यांना दिवसाला साधारणतः आठ ते दहा किलो टोमॅटो लागतो. तर मोठ्या हॉटेल व्यावसायिकांना दिवसाला २५ ते ३० किलोच्या आसपास टोमॅटोची गरज असते. सध्या टोमॅटोचे दर वाढल्याने गृहिणीप्रमाणे हॉटेल व्यावसायिकांनाही आर्थिक ताळमेळ बसविणे कठीण होत आहे. यातून मार्ग शोधत अनेक व्यावसायिकांनी पावभाजी करताना पाककृतीत बदल करत टोमॅटोचा वापर निम्म्यावर आणला आहे. टोमॅटोची किंमत वाढल्याने खाद्य विक्रेत्याकडून तडजोड केली जात आहे. याचा परिणाम खाद्य पदार्थाच्या चवीवरही परिणाम होत आहे. परंतु टोमॅटोचे वाढते दर परवडणारे नसल्याने आमच्यापुढेही पर्याय नाही, असे काही व्यावसायिकांनी सांगितले.
हॉटेल्समध्ये मिळणाऱ्या बहुतांश भाज्यांमध्ये टोमॅटोचा वापर केला जातो. त्यामुळे आता भाज्यांसाठी काही व्यावसायिक रेडी टू इट मसालेदेखील वापरतांना दिसून येत आहेत.
मेन्यूकार्डवरील टोमॅटो सूप नॉट अव्हेलेबल
काही ग्राहक हॉटेलमध्ये जेवणापूर्वी सूप घेणे पसंत करतात. परंतू टोमॅटोचे दर वाढल्याने हॉटेलच्या मेन्यूकार्डमध्ये टोमॅटो सूपच्या पुढे नॉट अव्हेलेबल असे लिहून ठेवले आहे. तर काही हॉटेल्समध्ये रेडी टू इट सूप ग्राहकांना उपलब्ध करून देण्याची शक्कल लढविली जात आहे. याचबरोबर दररोजच्या जेवणासह हॉटेलच्याही सॅलडमधून टोमॅटो वगळल्याचे दिसून येत आहे. त्याऐवजी सॅलडमध्ये काकडी, बिट आणि कांदा अधिक दिला जात आहे.
——————————————————————–
‘दरवाढीमुळे स्वयंपाकघरातील टोमॅटोचा वापर निम्म्यावर आणावा लागला. यापूर्वी साधारणतः एकाचवेळी १० ते २० जणांची पावभाजी तयार ठेवली जायची. मात्र, आता ग्राहकांच्या मागणीनुसार पावभाजी करण्याला प्राधान्य द्यावे लागत आहे.’
– संजय जगताप, हॉटेल व्यावसायिक, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta