वर्षभरात तीनवेळा समाजकंटकांचे कृत्य; कारवाईची मागणी
निपाणी (वार्ता) : यमगर्णी ता. निपाणी) येथील सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळा आवारात असलेल्या कुंड्यांमध्ये शोभेसह औषधी रोपे व विविध जातींची रोपे विद्यार्थी व शिक्षकांनी लावली आहेत. परंतु काही समाजकंटकांनी या कुंड्यांची गेल्या वर्षभरात तीनवेळा मोडतोड केली आहे. त्यामुळे संबंधितावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शिक्षक व विद्यार्थ्यांनी केली आहे.
यमगरणी प्राथमिक व माध्यमिक शाळेत सध्या सुमारे पाचशे विद्यार्थी शिकत आहेत. या शाळेचा आवार मोठा असून सभोवती संरक्षक भिंत आहे. अलीकडेच या शाळेची रंगरंगोटी करण्यात आली आहे. शाळेच्याआवारात तसेच कार्यालय व सभोवती विद्यार्थी व शिक्षकांनी विविध रोपे लावली आहेत. तसेच अनेक कुंड्या खोलीच्या तसेच कार्यालयासमोर ठेवण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षभरात तीनवेळा येथील कुड्यांची मोडतोड करण्यात आली असून यामधील रोपे काढून मोठ्या प्रमाणातनासधूस करण्यात आली आहे. ही बाब शिक्षकांनी एसडीएमसी पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
वारंवार असे प्रकार घडत असल्याने संबंधितांचा शोध घेणे गरजेचे आहे, असे मत प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक नंदकुमार कांबळे यांनी व्यक्त केले.
——————————————————————
‘शाळा आवारात विद्यार्थी व शिक्षकांनी तसेच अनेक सामाजिक संघटना व नागरिकांनी विविध रोपे लागवडीसाठी शाळेला दिली आहेत. मात्र, काही समाजकंटकांकडून कुंड्यांची मोडतोड व रोपांचे नुकसान केले जात आहे. ही बाब चिंताजनक आहे.
– अरविंद कांबळे मुख्याध्यापक माध्यमिक स्कूल