
निपाणी : निपाणी नगरपालिकेवर राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांना भगवा फडकविण्यापासून रोखून निपाणी नगरपालिका प्रशासनाने वादाची ठिणगी टाकली आहे.
याबाबत “बेळगाव वार्ता”च्या प्रतिनिधीशी बोलताना नगरसेवक संजय सांगावकर म्हणाले की, निपाणी नगरपालिकेवर 1991 पासून भगवा फडकत आहे. तसा ठराव देखील सभागृहात मंजूर झाला होता. 1991 पासून दर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी व 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी हा भगवा ध्वज बदलण्यात येत होता. यावेळी मात्र या प्रथेत खंड पडला. निपाणी नगगरपालिकेचे नगरसेवक संजय सांगावकर व विनायक वडे यांनी निपाणी नगरपालिका आयुक्तांना याची आठवण करून देत जीर्ण झालेला भगवा बदलण्याची विनंती केली होती मात्र आयुक्तांनी नगरसेवकांच्या विनंती वजा सुचनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत 14 ऑगस्ट पर्यंत जीर्ण झालेला भगवा ध्वज बदलला जाईल असे सांगितले. मात्र 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांच्या उपस्थितीत तिरंगा फडकविण्यात आला त्यानंतर निपाणी नगरपालिकेचे नगरसेवक विनायक वडे व संजय सांगावकर हे भगवा फडकविण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.
दरम्यान नगरसेवक संजय सांगावकर बोलताना पुढे म्हणाले की, आजपर्यंत निपाणी शहर हे शांतताप्रिय शहर म्हणून ओळखले जाते. निपाणीत सर्व जाती धर्माचे, सर्व भाषिक लोक गुण्यागोविंदाने नांदतात पण प्रशासनाच्या या धोरणामुळे भाषिक वाद निर्माण होईल की काय अशी शंका सर्वसामान्य निपाणीकर व्यक्त करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta