निपाणी (वार्ता) : येथील रोटरी क्लब ऑफ निपाणी, रोटरी क्लब ऑफ हुबळी आणि शालबी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता.१९) मोफत गुडघे रोपण व मणक्याची शस्त्रक्रिया तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. येथील आंदोलन नगरातील रोटरी क्लबच्या डॉ. एम. जे. कशाळीकर सभागृहात पार पडलेल्या या शिबिराचा १०० हून अधिक रुग्णांनी लाभ घेतला.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ निपाणीचे अध्यक्ष प्रवीण उर्फ विरु तारळे यांनी स्वागत करून रोटरी क्लबने प्रत्येक आठवड्याला विविध आजारांवर तपासणी व उपचार सुविधा रुग्णांना उपलब्ध करून दिली आहे. सामाजिक भावनेतून रोटरीने आजपर्यंत अनेक उपक्रम राबवले असून त्याचा परिसरातील हजारो जणांना फायदा झाल्याचे सांगितले. यावेळी डॉ. विरल गोंदालिया, डॉ. अमृत सिंह, वरिष्ठ फिजिओथेरपिस्ट डॉ. राज लिंबानी आणि डॉ. संदीप पाटील यांनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी काही रुग्णांना शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला. शस्त्रक्रियेची तयारी असलेल्या रुग्णांची शालबी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदाबाद येथे ५० टक्के सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे सांगितले.
यावेळी संजय नंदर्गी, राजेश तिळवे, महांतेश हिरेकुडी, सुबोध शहा, सुजय शहा, सुहास परमणे, दिलीप पठाडे, गजेंद्र तारळे, आशिष कुरबेट्टी, हुबळी येथील रोटरीचे पदाधिकारी सुरेंद्र पोरवाल, अरविंद कुपसद, डॉ. कौस्तुभ खांडके, डॉक्टर बसवराज कऱ्यापगोळ, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा श्रेया खेडेकर, अर्चना बुर्जी, स्नेहा बेडकीहाळे, वर्षा नंदर्गी यांच्यासह रोटरीचे पदाधिकारी, सदस्य, रुग्ण उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta