चार तक्रारी दाखल; कामे न होण्यासह लाचेची मागणी
निपाणी (वार्ता) : शहरातील महसूल खात्यासह विविध सरकारी कार्यालयामध्ये सर्वसामान्य नागरिकांची कामे होण्यासाठी अनेक अधिकारी आणि कर्मचारीअडचण करत आहेत. शिवाय कामासाठी लाच मागत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पार्श्वभूमीवर जिल्हा लोकायुक्त हनुमंतराया व सहकाऱ्यांनी शुक्रवारी (ता.२५) दुपारी येथील शासकीय विश्रामधामात अचानक भेट दिली. यावेळी महसूल खाते, नगरपालिका व इतर कार्यालयातून चार तक्रारी अधिकाऱ्यांनी नोंदवून घेतल्या आहेत. महिन्याभरात दुसऱ्यांदा लोकायुक्तांनी निपाणीत धडक दिल्याने शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
गेल्याच महिन्यामध्ये येथील तहसीलदार कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने कागदपत्रावरील नाव बदलण्यासाठी लाचेची मागणी केली होती. त्यानुसार संबंधितांनी लोकायुक्ताकडे तक्रार करून अधिकारी व कर्मचाऱ्यांला रंगे हात पकडून त्यांच्यावर कारवाई केली होती. त्यानंतर महिनाभरात पुन्हा येथील महसूल खाते, पालिका कार्यालय, एडीएलआर आणि इतर कार्यालयातील कामे होत नसल्याची तक्रार शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी जिल्हा लोकायुक्त अधिकाऱ्याकडे केली होती. त्यानुसार जिल्हा लोकायुक्त हनुमंतराया, जे.रघु, बी एस पाटील, आर.जे. कलादगी व इतर अधिकाऱ्यांनी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास येथील शासकीय विश्रामगृहाला भेट देऊन नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. त्यानंतर आता टप्प्याटप्प्याने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यावर सापळा रचून कारवाई होण्याची शक्यता आहे.
निपाणी तालुक्यात गेल्या महिन्यात विविध शासकीय कार्यालयातून १९ नागरिकांनी कामासह लाच प्रकरणी तक्रारी केल्या होत्या. सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून सर्वच समस्या निकाली काढले आहेत. यापुढील काळात कोणत्याही शासकीय कार्यालयातील तक्रारी असल्यास प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येथील शासकीय विश्रामधामावर लोकायुक्त अधिकारी भेट देणार आहेत. त्यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या लेखी स्वरूपात देण्याचे आवाहन जिल्हा लोकायुक्त हनुमंतराया यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta