निपाणी (वार्ता) : येथील सेंट्रींग कामगाराने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. २८) सकाळी उघडकीस आली. स्वप्निल मनोहर सुतार (वय ३३ रा. जत्राटवेस मातंग समाज वसाहत, निपाणी) असे मृताचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की स्वप्निल हा गेल्या अनेक वर्षापासून सेंट्रींग कामगार म्हणून काम करत होता. आठ दिवस तो आपल्या पत्नीसह सासरवाडीला राहण्यासाठी गेला होता. रविवारी सायंकाळी तो आपल्या घरी परतला होता. मात्र घरात कोणीच नसल्याचे पाहून दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. घटनेची माहीती मिळताच घटनास्थळी बसवेश्वर चौक पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. मृत स्वप्निल यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. दोन दिवसापूर्वीच या परिसरातील केशव शिंदे या युवकाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच दुसरी आत्महत्येची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta