
आकर्षक गिफ्ट खरेदीसाठी गर्दी; दिवसभर युवती महिलांची लगबग
निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात बुधवारी बहीण भावाचे अतूट नाते सांगणारा रक्षाबंधन सण उत्साहात साजरा झाला. त्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसापासून येथील बाजारपेठेत राख्या खरेदीसाठी महिला व युवतींची गर्दी झाली होती.
बुधवारी (ता.३०) सकाळी शहर व ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील युवती व महिलांनी आपल्या लाडक्या भाऊरायाला राखी बांधून हा सण साजरा केला. यावेळी भावाकडूनही बहिणीला मोबाईल व इतर साहित्याची भेट देण्यात आली. दिवसभर गोड गोड अन्नाचा आस्वादही कुटुंबामधील सदस्यांनी घेतला. याशिवाय विविध शाळा आणि सामाजिक संस्थातर्फे ही राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली. राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार दिवसापासून निपाणी बाजारपेठेत राख्या खरेदीसाठी गर्दी झाली होती. त्यामुळे हजारो रुपयांची उलाढाल झाली. याशिवाय अनेकांनी बहिणीला गिफ्ट देण्यासाठी ऑनलाईन वर विविध वस्तूंची मागणी केली होती.
रोपांना राखी बांधून अनोखा रक्षाबंधन
रक्षाबंधन सणानिमि प्रत्येक कुटुंबातील महिला व युतीने आपल्या भाऊरायाला राखी बांधून आपल्या रक्षणाची जबाबदारी घेण्याचे आवाहन केले. पण येथील मुस्लिम समाजातील चाऊस कुटुंबियातील फिदा आणि सबा चाऊस भगिनींनी रोपांना राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा केला. संपूर्ण चाऊस कुटुंबीय पर्यावरणाला वाहून घेतल्याने या घराण्याला पर्यावरणाचा वसा लाभला आहे.
येथील सृष्टी पर्यावरणवादी संघटनेचे प्रमुख फिरोज चाऊस हे बऱ्याच वर्षापासून पर्यावरण प्रेमी नागरिक म्हणून निपाणी परिसरात परिचित आहेत. त्यांनी आतापर्यंत शहर आणि परिसरात विविध ठिकाणी हजारो रोपे लावून त्याचे संवर्धन केले आहे. त्यामुळे घराण्यातच पर्यावरणाविषयी प्रेम असलेल्या दोघी बहिणींनी रक्षाबंधन सणाची औचित्य साधून आपल्या घराच्या परिसरात असलेल्या रोपांना राखी बांधून मानवाचे रक्षण करण्याचे आवाहन केले. याशिवाय रोपे आणि झाडांना राख्या बांधून झाडांचे संरक्षण करण्याची प्रतिज्ञा केली. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे शहर आणि परिसरातून कौतुक होत आहे.
—————————————————————–
कार्टून राख्यांचे आकर्षण
बाजारात उपलब्ध असलेल्या राख्यांमध्ये लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या कार्टून राख्यांचाही समावेश होता.२० रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यत त्यांची विक्री झाली. तसेच विविध प्रकारच्या आकर्षक राख्याही १० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत पाहायला मिळाल्या.
——————————————————————
व्यवसाय मंदीत
दरवर्षी साधारणपणे महिनाभर आधीच खरेदीसाठी ग्राहक गर्दी करत असतात. मात्र, यावर्षी तालुक्यात दुष्काळाचे सावट पसरल्यामुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक कोंडीत सापडले आहेत. परिणामी, राख्या विक्रीचा व्यवसाय मंदीत असल्याची माहितीही राखी विक्रेत्यांनी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta