निपाणी (वार्ता) : डेंगी सदृश आजाराने निपाणीतील प्रगती नगरमधील युवकाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.५) सायंकाळी घडली सौरभ राजू माने (वय २६) असे या युवकाचे नाव आहे.
सौरभ माने हा येथे चायनीजचा व्यवसाय करीत होता. आठ दिवसापूर्वी त्याला किरकोळ ताप येऊन रक्तातील प्लेटलेट्स कमी झाल्या होत्या. त्यामुळे त्याला उपचारासाठी कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचार सुरू असतानाच मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. सौरभ याचा विवाह तीन महिन्यापूर्वी झाला होता. पण त्याच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून प्रगती नगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत सौरभ यांच्या मागे आई-वडील, भाऊ, पत्नी असा परिवार आहे.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी प्रगती नगर आणि आंदोलन नगर परिसरात चुकून गुनिया आणि डेंगी सदृश आजारामुळे नागरिक आजारी पडत होते. त्यामुळे येथील नागरिकांनी या भागातील स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी केली होती. पण अजूनही या परिसरात अस्वच्छता असल्याने चुकून गुनिया आणि डेंगी सदृश्य आजार उद्भवत असल्याने नागरिकांत भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने प्रगतीनगर आणि आंदोलन नगर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta