
काकासाहेब पाटील; मूक मोर्चाने तहसीलदारांना निवेदन
निपाणी (वार्ता) : संविधानाने सर्वच समाजाला न्याय मागण्याची तरतूद केली आहे. असे असताना जालना जिल्ह्यातील सराटी येथे मराठा समाजातर्फे शांततेने धरणे सत्याग्रह सुरू होता. त्यावेळी महाराष्ट्र शासन आणि पोलिसांनी सत्याग्रह करणाऱ्या वर अमानुष लाठीमार करणारी घटना निंदनीय आहे. यापुढील काळात महाराष्ट्रात अशा घटना घडल्या तर त्याचे तीव्र पडसाद सर्वप्रथम निपाणीत उमटतील, असा इशारा माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी दिला.
मराठा समाजातील आंदोलकावर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ निपाणी मराठा समाजातर्फे शुक्रवारी (ता. ८) सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर माजी आमदार काकासाहेब पाटील माजी मंत्री वीरकुमार पाटील, सुभाष जोशी, लक्ष्मण चिंगळे, राजेश कदम, जयवंत भाटले, प्रवीण भाटले, सुमित्रा उगळे यांच्या हस्ते तहसीलदार प्रवीण कारंडे यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी काकासाहेब पाटील बोलत होते.
प्रारंभी सुमित्रा उगळे व मान्यवरांच्या हस्ते मध्यवर्ती शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मूक मोर्चाला प्रारंभ झाला. चाटे मार्केट, जुना पीबी रोड बेळगाव नाका मार्गे हा मोर्चा तहसीलदार कार्यालयापर्यंत करण्यात आला. यावेळी लक्ष्मण चिंगळे यांनी निवेदनाचे वाचन केले.
निवेदनातील माहिती अशी, महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शांततेने अमरण उपोषण करीत होते. तरीही जालना जिल्हा पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलकांवर अमानुष लाठी हल्ल्यासह आश्रुधूर सोडून रबरी गोळीबार करून निष्पाप आंदोलन कर्त्या तरूण, महिला, अबाल वृद्धांना जखमी करून आंदोलन चिरडण्याचे न कृत्य केले. त्याचा सकल मराठा समाज निपाणी भाग यांच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत. याची कर्नाटक सरकारने नोंद घेऊन राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींच्या निदर्शनात सदर घटना आणण्याचे आवाहन केले आहे.
यावेळीयावेळी पंकज पाटील, बाळासाहेब देसाई सरकार, शंकरदादा पाटील, राजेंद्र वड्डर, विलास गाडीवड्डर, अण्णासाहेब हवले, राजू गुंदेशा, विजय शेटके, राजू पवार, राजेंद्र चव्हाण, गणी पटेल, गोपाळ नाईक, मुन्ना काझी, बाबासाहेब खांबे, निकु पाटील, विक्रम देसाई, विश्वास पाटील, प्रा. भारत पाटील, नवनाथ चव्हाण, जरारखान पठाण, प्रदीप जाधव, प्रा. शिवाजी मोरे, यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, निपाणी शहर आणि ग्रामीण भागातील मराठा समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta