बेंगळूर येथे छायाचित्रकारांचा सन्मान
निपाणी (वार्ता) : छायाचित्रकारांची समाजातील भूमिका महत्त्वपूर्ण असते छायाचित्रकार हा प्रत्यक्ष घडणाऱ्या घटना समारंभ यांना जिवंत ठेवण्याचे काम करत असतो. प्रिंट मीडिया असो किंवा सोशल मीडिया या माध्यमातून देखील छायाचित्रकार महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात. सध्या मोबाईलच्या युगात छायाचित्रकारांचे महत्त्व कमी झाल्याचे बोलले जात असले तरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून छायाचित्रकारांनी आपले महत्त्व कायम टिकवून ठेवले आहे. अशा या छायाचित्रकारांना बेंगळूर अशा ठिकाणी सर्व सोयीनियुक्त सुसज्ज असे भवन उभे करून दिले जाणार आहे, अशी ग्वाही कॅबिनेट मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली
कर्नाटक फोटोग्राफर असोसिएशनतर्फे बेंगळूर येथे पॅलेस ग्राउंड या ठिकाणी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून छायाचित्रकार म्हणून कार्य करताना विशेष कामगिरी केलेल्या त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या छायाचित्रकारांच्या सन्मानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निपाणी येथून नरेंद्र बाडकर व विनायक पाटील यांना सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रारंभी कर्नाटक फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष एस. परमेशा यांनी स्वागत केले. कर्नाटक फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने मंत्री सतीश जारकीहोळी यांना भवन उभारणीचे निवेदन पदाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आले.
मंत्री जारकीहोळी म्हणाले, फोटोग्राफी क्षेत्रात नवनवे तंत्रज्ञान पुढे येत आहे. व्यवसाय यापुढे देखील टिकवण्यासाठी आणि त्यातून मिळणारा रोजगार नियमित ठेवण्यासाठी या तंत्रज्ञानाला आपलेसे केले पाहिजे. ग्रामीण भागातील छायाचित्रकारांना देखील हे प्रशिक्षण मिळायला हवे. यासाठी निर्माण केल्या जाणाऱ्या भावनांमध्ये वेगवेगळी प्रशिक्षण शिबिरे देखील आयोजित केली जातील. वेगवेगळ्या प्रदर्शनाच्या माध्यमातून नवे तंत्रज्ञान जाणून दिले जाईल असे सांगितले.
यावेळी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून छायाचित्रकार तसेच छायाचित्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. सेक्रेटरी ए. एम. मुरली यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta