मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर; आरक्षणासाठी निपाणीत महामार्ग रोको
निपाणी (वार्ता) : लिंगायत समाजाला २-ए आरक्षण मिळावे यासाठी आतापर्यंत पाच आंदोलने झाली आहेत. तरीही आरक्षण न मिळाल्याने समाजाने लढा तीव्र करून सहावे आंदोलन सुरू केले आहे. आरक्षणाअभावी समाजाची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आपण या लढ्यामध्ये सहभागी झालो आहोत. या समाजाची मागणी सरकारपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे. लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबतची माहिती घेऊन समाजाला आरक्षण देण्याची मागणी करणार असल्याचे काही महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.
लिंगायत समाजाला २-ए आरक्षण मिळावे, समाजातर्फे रविवारी (ता.१०) येथील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करून इष्टलिंग पूजा करण्यात आली. यावेळी आंदोलकांना भेट देऊन त्या बोलत होत्या. यावेळी आरक्षणाच्या मागणीचे निवेदन समाजातर्फे स्वामींच्या हस्ते हेब्बाळकर यांना देण्यात आले.
कुडलसंगम पिठाचे जगद्गुरु बसवजय मृत्युंजय स्वामी म्हणाले, आरक्षणाअभावी लिंगायत समाजाची प्रगती होणे अशक्य आहे. त्यामुळे आरक्षणासाठी अनेक वर्षापासून आंदोलने सुरू आहेत. अजूनही समाजाला आरक्षण न मिळाल्याने सरकारवर दबाव आणण्यासाठी रस्त्यावर बसून इस्ट लिंग पूजा करावी लागत आहे. देशात अशा प्रकारचे हे पहिलेच आंदोलन असून सरकारला जाग येईपर्यंत अशा प्रकारचे आंदोलन सुरूच राहणार आहेत. त्यासाठी समाज बांधवांनी एकत्र येऊन लढा देण्याचे आवाहन केले.
राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी म्हणाले, लिंगायत समाजाची मागणी योग्य असून अखेरच्या टप्प्यात हे आरक्षण रखडले आहे. आता आरक्षणबाबत सरकार अनुकूल आहे. याबाबत प्राथमिक चर्चा झाली असून लवकरच समाजाला न्याय मिळेल. तसेच शासन दरबारी याबाबत पाठपुरावा करणार असून लवकरच न्याय मिळेल, असा विश्वास आहे. राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भावनात झालेल्या कार्यक्रमात शिक्षक मतदार संघाचे आमदार प्रकाश हुक्केरी, धारवाड येथील आमदार विनय कुलकर्णी यांच्यासह विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. स्वागताध्यक्ष सुनील पाटील यांनी स्वागत केले. यावेळी सुमारे वीस मिनिटे महामार्ग रोखून समाज बांधवांनी इष्ट लिंग पूजा केली. यावेळी पोलीस उपाधीक्षक गोपाळकृष्ण गौडर, निपाणी मंडल पोलीस निरीक्षक बी.एस.तळवार यांच्या नेतृत्वाखाली सह परिसरातील पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
मोर्चामध्ये माजी मंत्री शशिकांत नाईक, पुष्कर तारळे, आर. के. पाटील, निंगापा मुरबनावर, गुंडू पाटील, इराणा बुसुरोट्टी, सबगोंडा पाटील, अमरेश नांगनुरे, रमेश पाटील, महालिंगेश कोठीवाले, किरण पांगिरे, बसवराज भाते, महांतेश कडाडी, रवी गुळगुळे, अशोक हरगारे, गुंडू पाटील यांच्यासह निपाणी, चिक्कोडी आणि बेळगाव भागातील लिंगायत समाज बांधव सहभागी झाले होते.
———————————————————–
शहरातून दुचाकी रॅली
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सकाळी दहा वाजता समाज बांधवांनी महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे ध्वज घेऊन शहरातून दुचाकी रॅली काढली. तसेच महात्मा बसवेश्वर,छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धर्मवीर संभाजी राजे यांच्या पुतळ्यांना स्वामीजींच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. तर आंदोलन नगरातील हुतात्मा शेतकऱ्यांना अभिवादन केले.
—
Belgaum Varta Belgaum Varta