निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील जनता शिक्षण मंडळ संचालित देवचंद महाविद्यालयातील माजी विद्यार्थी व पालक संघाची वार्षिक सर्वसाधारण पार पडली. यामध्ये विविध विषयांची माहिती देण्यात आली.
विद्यार्थी व पालक संघाचे अध्यक्ष डॉ. सुनील ससे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सेक्रेटरी प्रा. डॉ आर. के. दिवाकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. खजिनदार प्रा. विजयकुमार पाटील यांनी सन 2022-23 या आर्थिक वर्षातील संघाचा जमा-खर्च सादर करून मंजुरी घेतली. कॉलेजच्या प्राचार्या डॉ. जी. डी. इंगळे यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक विकासाचा आढावा घेतला. ऐनवेळी आलेल्या विषयांना अध्यक्षांच्या परवानगीने चर्चेस घेण्यात आले.
शैक्षणिक वर्षांमध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रकाश शाह, डॉ. रघुनाथ कडाकणे, प्रो. डॉ. जी. डी इंगळे, डॉ. बाबासाहेब बेलेकर, डॉ. येल्लुरे, सुभाष भादोले, दत्तप्रसाद चौगुले, सुरेश पाटील यांचा समावेश होता.
सत्कारमूर्तींनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी देवचंद महाविद्यालयाने प्राप्त केलेल्या ‘अ प्लस ‘ मानांकनाबाबत महाविद्यालयाचे विशेष अभिनंदन केले. शिवाय अध्यक्षांनी नवीन सुरू केलेल्या अभ्यासक्रमांच्या विषयी त्यांनी समाधान व्यक्त केले.
आशिषभाई शाह म्हणाले, माजी विद्यार्थी व पालक संघ अर्जुननगर आयोजित मेळाव्यासाठी 300 हून अधिक माजी विद्यार्थी उपस्थित राहिल्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती खूपच उल्लेखनीय आहे. महाविद्यालयाची कामगिरी गेल्या काही वर्षापासून उत्कृष्ट होत आहे. महाविद्यालयात वर्षभर विविध उपक्रम निरंतर सुरू आहेत. प्रत्येक विभागात व प्रत्येक क्षेत्रात नेत्रदीपक अशा यशाची गवसणी घालण्याची परंपरा आजही चालू आहे. माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियातून देवचंद महाविद्यालयाचे नाव किती दूरपर्यंत पसरले आहे हे लक्षात येते. महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीतही माजी विद्यार्थ्यांचा असाच सहभाग राहावा, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. बाळासाहेब सूर्यवंशी यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta