ज्येष्ठा गौरी पूजनानंतर गाण्यांचा फेर; आधुनिक युगातही गौरी गीतावर भर
निपाणी (वार्ता) : नागपंचमी, गौरी-गणेश हे प्रामुख्याने महिलांचे सण म्हणून साजरे केले जातात. गौरी सणासाठी सासूरवासिनी माहेरी दाखल झाल्या आहेत. त्यानिमित्ताने निपाणी शहर व ग्रामीण भागात झिम्मा फुगडीसह गौरीगीतांचा माहोल दिसत आहे.
काळाच्या ओघात गौरी-गणेशाची गाणी दुर्मीळ होत चालली आहेत. शहरी भागात कॅसेट, सिडी, पेन ड्राईव्ह, मोबाईलच्या माध्यमातून ही गाणी ऐकावयास मिळत आहेत. मात्र ग्रामीण भागात अद्यापही गौरी-गणपतीची गाणी टिकून आहेत. नावांच्या उखाण्याप्रमाणे फुगडीचे उखाणेही रात्र जागवित आहेत. उखाण्यातून कधी माहेरची थोरवी तर कधी मैत्रीचा चिमटा घेतला जात आहे. गौरी- गणपतीच्या सणात नानाविध नमुन्याचे उखाणे कानी पडत आहेत.
‘ये गं गौराबाई सुख देऊन जाई’ ‘वाट तुझी बघतोय शंकर भोळा गं,
कपाळाला शोभतोया कुंकवाचा टिळा गं,’अशा गाण्यांची रेलचेल सध्या सुरू आहे.
‘घागर वाजू दे, वाजू दे
गवर माझी येवू दे….
या फुगडीतील उखाण्याप्रमाणे गौरीच्या सणाला फेऱ्याची गाणीही म्हटली जात आहेत. झिम्मा फुगडीची प्रथा गेल्या दशकापासून कमी होत चालली आहे. सण-संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी मोठमोठ्या शहरात झिम्मा- फुगडीच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातआहेत. अनेक गणेशोत्सव मंडळांनी हमखास ग्रामीण गाण्यांचे कार्यक्रम सुरू केले आहेत.
‘नाच गं घुमा कशी मी नाचू, शिंपी न्हाई आला चोळी न्हाई मला, कासार न्हाई आला, बांगड्या न्हाई मला नाच गं घुमा कशी मी नाचू..
हे गीत सर्रासपणे कानी पडत आहे. पूर्वी शेतात मोटेच्या साहाय्याने पाणी दिले जात. त्या काळापासून चालत आलेली अनेक गीते अजूनही ऐकावयास मिळत आहेत. दरवर्षी महिला वर्ग गौरी-गणपती सणाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. ग्रामीण भागातील महिलांना मृग नक्षत्रापासून या सणांपर्यंत शेतीकामात गुंतावे लागते. गौरीच्या निमिताने मुराळी बोलविण्यास आल्यावर सासुरवासिनींना सुखद दिलासा मिळतो. माहेरी गेल्यानंतर गौरीगीतातून सासरची थोरवी गाण्याची प्रथाही रूढ आहे.
‘फू बाई फू, फुगडी, चमचम करती लुगडी’ अशा गीतातील उखाण्यांनी गर्दी केली आहे. संसार, नोकरी, व्यवसाय, शिक्षणात अडकलेल्या महिलांना झिम्मा फुगडीसाठी पुरेसा वेळ देणे अशक्य आहे. तरीही गौरीगीताचे सूर कानावर पडताच त्या क्षणभर का होईना विसावताना दिसत आहेत. एकंदरीत ग्रामीण भागाबरोबर शहरातही गौरी सणाच्यानिमिताने जुन्या गाण्यांच्या आठवणींना उजाळा मिळत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta