निपाणी (वार्ता) : कुर्ली येथील रहिवाशी व म्हाकवे इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज म्हाकवे शाळेचे गणित विषयाचे शिक्षक युवराज पाटील यांना कोल्हापूर येथील रोटरी क्लब ऑफ मुव्हमेंट यांच्यातर्फे ‘राष्ट्र निर्माता’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी संतोष पाटील, रोटरीचे जिल्हा प्रांतपाल नासिर बोरसद्वाला व मान्यवरांच्या हस्ते पाटील यांना गौरवण्यात आले.
पाटील यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अतुलनीय योगदान दिलेले आहे. विज्ञान प्रदर्शनामध्ये त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी राष्ट्रीय पातळीपर्यंत चमकले आहेत.
कोरोना काळामध्ये युट्युब चॅनेलच्या माध्यमातून त्यांनी गणित विषयाचे चांगले मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले आहे. ग्रामीण भागामध्ये विज्ञान प्रसारासाठी तसेच वाचन चळवळीसाठी भरीव असे काम केले आहे. विविध शैक्षणिक, सामाजिक राजकीय कार्यक्रम, शिक्षण परिषद, साहित्य संमेलन अशा शेकडो कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट सूत्रसंचालन केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारामुळे पाटील यांचे कुरली, परिसरामध्ये कौतुक होत आहे.
यावेळी मुख्याध्यापक पांडुरंग भारमल, राहुल पाटील, मनिषा पाटील व रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.