साउंड सिस्टीम, ढोल पथकाच्या गजरात मिरवणुका
निपाणी (वार्ता) : “गणपती बाप्पा मोरयाऽऽ पुढच्या वर्षी लवकर याऽऽऽ” असा जयघोष, साऊंड सिस्टिमवरील आवाज, अत्याधुनिक प्रकाश यंत्रणा आणि ढोल ताशांच्या तालावर आनंदाने नाचत हजारो निपाणीकरांनी लाडक्या बाप्पाला गुरूवारी (ता.२८) भावपूर्ण निरोप दिला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात रात्री उशिरापर्यंत बाप्पांचे विसर्जन झाले. अनुचित प्रकार टाळण्यासाठी मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तलवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .
गुरुवारी दुपारपासूनच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची विसर्जन मिरवणुकीची लगबग सुरू होती. सायंकाळी चारनंतर विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या. फटाक्याची आतषबाजी गुलालाची उधळण करून कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
गणेशोत्सवाचे ५२ वर्ष साजरे करणाऱ्या येथील महादेव गल्लीतील गणेशोत्सव मंडळाची चांदीच्या रथातील बैलगाडीतून काढलेली विसर्जन मिरवणूक शिस्तबद्धपणे झाली. प्रारंभी मंडळाचे संस्थापक व माजी सभापती सुनील पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अमर बागेवाडी, रवींद्र कोठीवाले यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन झाले. यावेळी समीर बागेवाडी, महेश बागेवाडी, संजय मोळवाडे, दयानंद कोठीवाले, डॉ. महेश ऐनापुरे, मल्लिकार्जुन गडकरी, महेश दुमाले, अण्णासाहेब जाधव, प्रकाश पणदे, सदाशिव चंद्रकुडे, शिवकांत चंद्रकुडे, रवि चंद्रकुडे, अशोक चंद्रकुडे, बाबासाहेब चंद्रकुडे, विजय दुमाले, रोहित पाटील, गणेश खडेद, मल्लेश चौगुले, प्रमोद पणदे, चंद्रकांत चौगुले, निखिल चंद्रकुडे, महांतेश चंद्रकुडे, राहुल चंद्रकुडे,नितीन गुरव, अमोल मोळवाडे, सचिन गुरव, विनय पाटील यांच्यासह एसपी ग्रुप, गणेशोत्सव मंडळ, गणेश हेल्थ क्लब, महादेव मंदिर कमिटी सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.
येथील महादेव मंदिरापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीत ढोल वादन पथक, अत्याधुनिक प्रकाश यंत्रणा व साऊंड सिस्टिम सहभागी झाले होते. गांधी चौक, कोठीवाले कॉर्नर, नेहरू चौक, जुना मोटर स्टँड, कित्तूर चन्नम्मा चौक, कोठीवाली कॉर्नर दलाल पेठ, जत्रावेस मार्गे बागेवाडी विहिरीमध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन झाले.
यावर्षी डीजे साऊंड सिस्टीम, पारंपरिक वाद्यांसह आकर्षक विद्युत रोषणाईत विसर्जन मिरवणुका काढल्या. रात्री आठनंतर मिरवणुका पाहण्यासाठी शहरवासीयांनी रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी केली होती. मिरवणुकीतील क्षण सेल्फीसह सोशल नेटवर्कवर शेअर करण्यात येत होते. गुरुवारी अनंत चतुर्दशी दिवशी सर्वच गणेशमूर्तीचे विसर्जन असल्याने मिरवणूक मार्गावर पोलीस लक्ष ठेवून होते. शहरातील अनेक गणेश मूर्ती येथील वेदगंगा नदी, दौलतराव पाटील मळ्यातील खण, अंमलझरी रोडवरील विहीर, तलाव आणि विविध ठिकाणी विसर्जन करण्यात आले.