
बियाण्यांच्या दरात दुपटीने वाढ
निपाणी (वार्ता) : गतवर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचे नुकसान झाले होते. यंदा मात्र या उलट परिस्थिती झाल्या असून पावसाअभावी पिके वाळून गेली आहेत. आता तोंडाशी आलेली सोयाबीन व इतर पिके काढण्याची कामे सुरू असून रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीची तयारीही शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील कृषी संपर्क केंद्रात रब्बी हंगामासाठी लागणारे बी बियाणे दाखल झाले आहेत. सोमवारपासून (ता.९) वितरण करण्यात येणार आहे. सवलतीच्या दरातील बियाणांसाठी सामान्य वर्गातील शेतकऱ्यांनी आधार कार्ड तसेच एससीएसटी वर्गातील शेतकऱ्यांनी आधार कार्ड व जातीचे प्रमाणपत्र घेऊन येण्याचे आवाहन कृषी खात्याने केले आहे.
उसाची तोडणी आणि सोयाबीन काढण्याची कामे संपताच यंदाच्या रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला प्रारंभ होणार आहे. तत्पूर्वी शेती मशागतीच्या कामांना वेग येणार आहे.
येथील कृषी संपर्क केंद्रात ५० क्विंटल हरभरा, ३६ क्विंटल ज्वारी, १५ क्विंटल गहू बियाणे उपलब्ध झाले आहे. सोयाबीन काढणीनंतर शेत रिकामे होणार आहे. त्यानंतर शाळू, हरभरा, गहू पेरणीसाठी आवश्यक तयारी होणार आहे. यंदा रब्बी हंगामात १ हजार हेक्टरवर शाळू पेरणी होण्याचा अंदाज आहे. १६० हेक्टर क्षेत्रात हरभरा तर ३५ हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी होणार आहे.
सध्या पावसाचे प्रमाण कमी असून परतीच्या पावसाच्या काळात पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे पाऊस न झाल्यास यंदा पाण्याअभावी उसाचे क्षेत्र कमी होऊन शाळू आणि गव्हाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रब्बीच्या पेरणीसाठी मालदंडी जातीचे शाळू बियाणे उपलब्ध झाले आहे. तीन किलोच्या पॅकेटमध्ये शाळू बियाणे उपलब्ध असून हे पॅकेट सामान्य शेतकऱ्यांना २०४ रूपये तर एससी एसटी शेतकऱ्यांना १७४ रुपये प्रमाणे वितरित केले जाणारआहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा शाळू बियाण्यांच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. जेजेएल-१ जातीचे हरभरा बियाणे उपलब्ध असून २० किलोचे पॅकेट सामान्य शेतकऱ्यांना १२०० रुपये तर एससीएसटी शेतकऱ्यांना ९५० रुपये प्रमाणे देण्यात येणार आहे. डीडब्ल्यूआर जातीचे गहूचे ३०किलोचे पॅकेट सामान्य शेतकऱ्यांना १५३०तर एससीएसटी वर्गातील शेतकऱ्यांना १३०५ रुपयाप्रमाणे वाटप होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta