
निपाणी (वार्ता) : दुचाकी एक्सल व ट्रॅक्टर यांच्या झालेल्या धडकेमध्ये बेनाडीतील दाम्पत्यांचा मृत्यू झाल्याची घटना कनेरीवाडी क्रॉस नजीक गुरुवारी (ता.५) सायंकाळी घडली. संदीप बापूसो कोळी (वय ४०) व राणी संदीप कोळी (वय ३५ रा. बेनाडी, ता. निपाणी) अशी या घटनेतील मयत दाम्पत्यांची नावे आहेत.
संदीप व त्यांची पत्नी राणी हे दोघे कणेरी मठ येथील आपल्या पाहुण्यांच्या घरी आजारी व्यक्तीला पाहण्यासाठी गेले होते. परत येत असताना कणेरीवाडी क्रॉसजवळ पाठीमागून आलेल्या ट्रॅक्टरने त्यांच्या वाहनाला जोराची धडक दिल्याने हे दोघेही रस्त्यावर कोसळले. यामध्ये राणी यांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघात स्थळी जमलेल्या नागरिकांनी आपत्कालीन रुग्णवाहिका मागवून घेतली. त्यातून संदीप कोळी यांना उपचारासाठी नेत असताना आपल्या पत्नीची झालेली अवस्था पाहून हृदयाचे ठोके वाढल्याने हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचाही उपचारापूर्वी मृत्यू झाला.
संदीप कोळी, राणी कोळी हे संपत अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या निधनाने गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
संदीप हा एमआयडीसीमध्ये कामावरती जात होता. तर त्याची पत्नी राणी या गृहिणी होत्या. त्यांच्या मागे आई-वडील दोन मुले, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.
सदरच्या अपघाताची नोंद गोकुळ शिरगाव एमआयडीसी, पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta