बेनाडी हायस्कूलमध्ये गुरुवंदना : शिक्षकांच्या खाल्ल्या छड्या
निपाणी (वार्ता) : ओळखलंस का मला?… सॉरी नाही ओळखलो!..अरे मी…अरे बापरे!, कसा ओळखणार? तू किती बदलायस! अरे तुला भेटून किती बरं वाटलं म्हणून सांगू…’
आणि मग कडकडून मिठी मारण्याचा प्रसंग बेनाडी येथील श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल मध्ये घडला. निमित्त होते, गुरुवंदना मित्रोत्सव कार्यक्रमाचे!
तब्बल ३५ वर्षानंतर १९८८ सालचे वर्गमित्र आणि शिक्षक भेटल्याने सर्वांनाच आनंद अश्रू अनावर झाले होते. यावेळी शिक्षकांनी अभ्यासाचा तास घेऊन माजी विद्यार्थ्यांनी छड्याही खाल्ल्या.
प्रारंभी सवाद्य मिरवणुकीने गुरुजनांचे कार्यक्रम स्थळी आगमन झाले. दुतर्फा असलेल्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनिनी फुले उधळून त्यांचे स्वागत केले. खूप वर्षांनंतर भेटलेल्या मित्र-मैत्रिणीशी गप्पा कांहीं केल्या थांबत नव्हत्या. राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दादासाहेब पाटील यांनी स्वागत केले. तर श्रीशैल मठपती यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर गुरुजनांचे पाद्य पूजन झाले. या सोहळ्याने शिक्षक सुद्धा भारावून गेले. विद्यार्थ्यांचे हे अनोखे प्रेम पाहून नकळत त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. यावेळी गुरुजनांचा सत्कार झाला.
गुरुजनांच्या मनोगताने पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. शिवाय मुला-मुलींच्या डोळ्यात अश्रू आणले. बी.एन. इंगळे यांनी मार्मिक आठवणी सांगून मुलांना मनसोक्त हसवले. ए. बी. बसर्गे, आर.जे. सोलापूरे, एम.ए. जमदाडे या गुरुजनांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
दुपारच्या सत्रात निवृत्त शिक्षक इंगळे आणि बसर्गे यांच्या उपस्थितीत परिचय सोहळा रंगला. सर्व मुलींना स्मृतिचिन्ह आणि माहेरची साडी भेट देण्यात आली. यावेळी खेळाच्या मैदानात उतरून खो-खो चा खेळ रंगला.
इंगळे सरांनी भरवलेल्या माजी विद्यार्थी वर्गात जुन्या आठवणी नुसार आपले बेंच निवडले. ‘१८५७ चे स्वातंत्र्य समर’ हा घटक सरांनी शिकविला. उनाडक्या करणाऱ्या मुलांना सरांनी अक्षरशः छडीचा मार दिला. हा मार विद्यार्थ्यांनी आनंदाने घेतला. सरांनी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना त्या जुन्या आठवतील वर्गात नेऊन सोडले. शेवटी चहापान करून सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. यावेळी जे.आर. जनवाडे, बी. एस. मालगार, एम. एम. पाटील, एस.एस. संकपाळ, आर.जे. सोलापूरे, एल. एच. सूर्यवंशी उपस्थित होते. डी. एस. लवटे यांनी सूत्रसंचालन केले.