बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविल्याचा जल्लोष : सीमाभागात उडणार धुरळा
निपाणी (विनायक पाटील) : मागील सात वर्षापासून बंदी असलेल्या बैलगाडी शर्यतीला कर्नाटक शासनाने महिन्यापूर्वी परवानगी दिली होती. पण महाराष्ट्रात परवानगी नसल्याने त्या भागातील बैलगाडा येणे कठीण झाले होते. आता महाराष्ट्रात पुन्हा बैलगाडी शर्यत सुरू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काही शर्ती व अटीवर परवानगी दिल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे कर्नाटक महाराष्ट्रातील सीमाभागातील शेतकर्यांसह बैलगाडी शर्यत प्रेमीकडून स्वागत करण्यात येत आहे. आता पुन्हा सर्जा-राजा धावणार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
बैलगाडी शर्यती बंद झाल्याने निराश झालेल्या शेतकर्यांत पुन्हा चैतन्य पसरले असून ज्यांच्याकडे शर्यतीत भाग घेणारे बैल आहेत. ते बैलाला धावण्याचे प्रशिक्षण देण्याच्या तयारीला लागले आहेत. ज्यांनी शर्यती बंद झाल्यामुळे आपली बैलजोडी विकली होती. ते पुन्हा बैलजोडी खरेदी करण्याच्या शोधात आहेत. ग्रामीण भागासह अनेक शहरी भागातही यात्रा महोत्सव, सण व उत्सवादरम्यान बैलगाडी शर्यत असायची. ही बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी त्या परिसरातील शेतकर्यांसोबत नागरिकही मोठ्या संख्येने गर्दी करायचे. लाखो रुपयांची लयलूट असणार्या या बैलगाडी शर्यतीत सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपन्यातील शेतकरी नेहमी सज्ज असायचे. तर या बैलगाडी शर्यतीतील सर्जा-राजासह ढवळ्या-पवळ्या, या कॉमन नावासह तुफान, शर्मा, मोती अशी नावेही प्रचलित झाली होती. तर प्रेक्षकही या नावाने ओरडून गाडी हाकणार्यासह बैलालाही प्रोत्साहन द्यायचे. मात्र, बंदी येऊन जवळपास 7 वर्षाचा काळ लोटल्याने बैलांची ही नावे व बैलगाडी शर्यतीतील चित्त थरारक क्षण इतिहासजमा झाली होती. त्यामुळे उशिरा का होईना, शेतकर्यांच्या मागण्यांची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने शर्ती व अटीवर बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविल्याने शेतकल्पांसह बैलगाडी शर्यत प्रेमीमध्ये चैतन्य पसरले आहे. सरकारच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाने शर्ती व अटीवर बंदी उठविल्याने बैलगाडी शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
—————
पुन्हा बैल संगोपनाला प्राधान्य
शेतकरी शेती कामासोबतच बैलगाडी शर्यतीकरिता सुद्धा अतिरिक्त बैलजोडी पाळायचे. परंतु बंदी आल्याने अनेक शेतकर्यांनी आपल्याकडील शेती कामातील बैलजोडी व्यतिरिक्त असलेल्या बैलजोड्या विकल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाने शर्ती व अटीवर बंदी उठविल्याने शेतकरी पुन्हा बैलजोडी पाळण्यासह संगोपनाकडे वळतील.
—————
’बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविल्याचा आनंद झाला असून सर्वोच्च न्यायालयाचे आभार. न्यायालयाने बंदी उठविताना अटी व शर्ती घातल्या तशा प्रकारचा बैलांचा छळ होईल, असे कोणतेही कृत्य शेतकर्यांकडून होणार नाही, अशी मला खात्री आहे.’
– आप्पासाहेब देवर्षी, सदस्य, रेसिंग असोसिएशन बेनाडी.