कुर्ली-आप्पाचीवाडी यात्रा कमिटीतर्फे यात्रोत्सव कार्यक्रम जाहीर
निपाणी (वार्ता) : कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्रप्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कुर्ली – आप्पाचीवाडी येथील हालसिद्धनाथ देवाची यात्रा (भोंब) २८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. २८ पासून १ नोव्हेंबर अखेर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
२८ रोजी सकाळी श्रींची पालखी, सबिना सोहळा, रात्री ढोल जागर, २९ रोजी रात्री ढोलजागर, श्रींची पालखी प्रदक्षिणा, ३० रोजी रात्री श्रींची पालखी सबिना प्रदक्षिणा, उत्तर रात्री नाथांची पहिली भाकणूक होणार आहे. ३१ रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे. यादिवशी दिवसभर महानैवेद्य, रात्री श्रींची पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर उत्तर रात्री मुख्य दुसरी भाकणूक होणार आहे.
१ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता घुमटातील मंदिरात भाकणूक झाल्यानंतर दुपारी ४ वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणा होऊन यात्रेची सांगता होणार आहे. प्रतिवर्षी भरणाऱ्या या नाथांच्या भोंब पौर्णिमेच्या यात्रेला भाविकांची मोठी गर्दी असते. नाथांचे भक्त भगवान डोणे व त्यांचे चिरंजीव सिद्धार्थ डोणे (वाघापूरकर) यांची भाकणूक होते.
यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील लाखो भाविक हजेरी लावतात. यात्रेनिमित्त पूर्वतयारी सुरू असल्याची माहिती यात्रा कमिटी अध्यक्ष आप्पासाहेब माने व ग्राम पंचायतीतर्फे देण्यात आली.
यात्रा काळात ५ दिवस शाळा आवारात हालसिद्धनाथ सेवा संस्थेतर्फे भाविकांसाठी मोफत अन्नदानाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. भाविकांनी यात्रेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जादा बसेस, मोफत आरोग्य सेवा
यात्रेत येणाऱ्या विविध दुकानांसाठी जागा देण्याचे काम २५ रोजी होणार आहे. यात्राकाळात सौंदलगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे मोफत आरोग्य सेवा पुरवली जाणार आहे. भाविकांसाठी कोल्हापूर, कागल, निपाणी, चिकोडी, रायबाग, गारगोटी व संकेश्वर येथून जादा बसेसची सोय करण्यात आली आहे.