प्रवाशांची तारांबळ; खासगी वाहनामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड
निपाणी (वार्ता) : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे अमरण उपोषण करीत आहेत. त्याला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी (ता.३१) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर निपाणी आगारातील महाराष्ट्रात जाणाऱ्या बस सेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नोकरी, व्यवसायानिमित्त महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे हाल झाले. तर खाजगी वाहनाने निपाणी ते कोल्हापूर असा प्रवास करावा लागल्याने अनेकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला.
मंगळवारी (ता.३१) सकाळी ११ वाजेपर्यंत कर्नाटक महाराष्ट्रातील आंतरराज्य सेवा सुरू होती. पण महाराष्ट्र बंदची हाक दिल्याची बातमी समजताच निपाणी आगारातून कोल्हापूर, कागल, इचलकरंजी, मुरगूड, गारगोटी, गडहिंग्लज येथे जाणाऱ्या बस कर्नाटक हद्दीपर्यंतच सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कोल्हापूर पर्यंत जाणाऱ्या बस कोगनोळीपर्यंत, इचलकरंजीला जाणारी बस बोरगावपर्यंत, मुरगुड, गारगोटी पर्यंत जाणाऱ्या बस लिंगनूर हद्दीपर्यंत सोडण्यात आल्या. याबाबतची कोणतीच माहिती नसल्याने निपाणी आगारात महाराष्ट्रात जाणाऱ्या बसची चौकशी प्रवासी करीत होते. पण साडेअकरानंतर सर्वच बस बंद केल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली.
महाराष्ट्रात जाणाऱ्या सर्वच बस बंद झाल्याने याचा फायदा घेत खासगी वडाप वाहतूकदारांनी बस स्थानक परिसरात आरडा- ओरड करून प्रवाशांना खेचण्याचा प्रयत्न केला. नाईलाज असल्याने अनेक प्रवासी व नोकरदार जादा रक्कम देऊन खासगी वाहनाने जाणे पसंत केले. एकंदरीत अचानक झालेल्या या बस बंदमुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांची तारांबळ उडाली.
——————————————————————
महाराष्ट्रातील बस थांबल्यावर शुकशुकाट
नेहमी येथील बस स्थानकाच्या पश्चिमेस असलेल्या महाराष्ट्रात जाणाऱ्या बस थांबल्यावर प्रवाशांची मोठी गर्दी होत होती. पण बस बंद झाल्याने दुपारी १२ नंतर येथील महाराष्ट्रात जाणाऱ्या प्लॅटफॉर्मवर शुकशुकाट जाणवत होता. तर खाजगी वाहनांच्या थांब्यावर प्रवाशांची गर्दी दिसत होती.
——————————————————————
‘मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक दिल्याने दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत काही बस कोल्हापूर, इचलकरंजी, गारगोटी, गडहिंग्लज पर्यंत सोडण्यात आल्या. पण अप्रिय घटना रोखण्यासाठी सर्व बस कर्नाटक हद्दीपर्यंत सोडण्यात आल्या.’
-सांगाप्पा, आगार प्रमुख, निपाणी.
Belgaum Varta Belgaum Varta