सुरक्षिततेसाठी उपाययोजनांच्या सूचना
निपाणी (वार्ता) : शहरात गेल्या काही महिन्यापासून चोऱ्या, घरफोड्या व वाहन चोरीमध्ये वाढ झाली आहे. दिवाळीची सुट्टी असल्याने लक्ष्मीपूजनानंतर बहुतांश नागरिक चार-आठ दिवसांसाठी आपापल्या गावी किंवा सहलीनिमित्त परगावी जातात. त्यामुळे गावी जाणाऱ्यांनी घरातील मौल्यवान वस्तूंच्या अथवा वाहनांच्या सुरक्षिततेची उपाययोजनांच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. यंदा शहर पोलिसांनी ‘एक अर्ज पोलीस ठाण्याला’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
दिवाळी किंवा सुट्टीत सहलीनिमित्त बाहेरगावी जात असाल तर त्यासंदर्भात नागरिकांनी आपल्या हद्दीतील पोलिस चौकीकडे एक
अर्ज द्यावा. जेणेकरून पोलिस गस्तीपथकाकडून त्या परिसरात गस्त राहील. ‘एक अर्ज ठाण्याला’ हा अभिनव उपक्रम निपाणी मंडळ पोलीस निरीक्षक कार्यालयाकडून यंदाच्या दिवाळीत राबविला जात आहे. ज्यामुळे त्या-त्या परिसरात गस्तीतून पोलिसांना लक्ष ठेवता येऊ शकेल, असा या उपक्रमाचा उद्देश
आहे. दिवाळीनिमित्त शाळांसह औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांनाही सुट्टी असते. बहुतांशी नागरिक लक्ष्मीपूजनानंतर आपापल्या गावी दोन-चार दिवसांसाठी जातात. गेल्या काही दिवसांमध्ये शहरात चोऱ्या, घरफोड्यांसह दुचाकी वाहने चोरट्याच्या टार्गेटवर आहेत. तर बंद घर- फ्लॅट दिसताच ते फोडण्याचे प्रकार भरदिवसा होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस ठाणेनिहाय गस्ती पथकांची संख्या वाढवून सातत्याने दिवसरात्र गस्त घातली जाणार आहे.
नागरिकांनी परगावी जाताना मौल्यवान वस्तू घरात न ठेवता बँकेत लॉकरमध्ये ठेवावेत, वाहनांची सुरक्षितता तपासून घ्यावी. बहुमजली इमारत असल्यास सुरक्षा रक्षकाला सजग राहण्यास सांगावे. अनोळखी व्यक्तींना इमारतीमध्ये प्रवेश नाकारावा. शेजारी राहणाऱ्यांना सजग राहण्यास सांगावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. चोरट्यांकडून बंद घरांची रेकी करून चोऱ्या घरफोड्या केल्या जात आहेत. परिसरामध्ये दिवसरात्र पोलिस गस्ती पथके पोलिसांकडून तयार केली आहेत.
——————————————————————-

‘दिवाळी सुट्टीत परगावी जाण्यापूर्वी नागरिकांनीही मौल्यवान वस्तू घरात न ठेवता बँकेच्या लॉकर्समध्ये ठेवावेत. तसेच आपल्या शेजाऱ्यांना गावाला जात असल्याची कल्पना द्यावी. कॉलनी किंवा इमारतींमध्ये अनोळखी व्यक्ती दिसल्यास तत्काळ स्थानिक पोलिस ठाण्याला कळवावे.’
– बी. एस. तळवार, मंडल पोलीस निरीक्षक, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta