
ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील : कारदगा येथे मराठी साहित्य संमेलन
निपाणी (वार्ता) : मोबाईलच्या आक्रमणामुळे साहित्य, भाषा, माणसं, संवाद एकमेकांपासून दूर जात आहे. त्यामुळे साहित्य संमेलने माणसे जपण्याचे काम करत आहे. समाजाचा विकृत चेहरा
बदलण्याची ताकद साहित्यामध्ये आहे. सकारात्मक साहित्याची निर्मिती होऊन समाज परिवर्तन करण्याचे काम नव्यापिढीसमोर उभे राहिले आहे. लेखकाच्या स्वातंत्र्यावर मर्यादा येऊ पाहत आहे. निर्भीडपणा हा साहित्याचा गाभा आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील यांनी व्यक्त केले.

कारदगा तालुका (निपाणी) येथील साहित्य विकास मंडळातर्फे आयोजित २६ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलन प्रसंगी संमेलनध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
पाटील म्हणाले, समाज परिवर्तन करण्याची ताकद ही साहित्यात आहे. समाज आणि साहित्य या दोन्ही एकमेकापासून अलिप्त राहू शकत नाहीत. साहित्य समाजाचा आरसा आहे. साहित्य शब्दाने नव्हे तर वेदनेतून लिहिले पाहिजे. सामाजिक जागृती बरोबरच माणसाला सांस्कृतिक चेहरा देण्याची काम हे साहित्य करते. राजकारणी माणूस साहित्याच्या व्यासपीठावर असावा, कारण त्यांच्यावर समाजाचे अस्तित्व अवलंबून आहे. पत्रकारितेमध्येही साहित्यिक दडलेला असतो. समाजामध्ये चांगले सांगण्याचे काम साहित्य करते. माणसाच्या जीवनाची गोळा बेरीज म्हणजे साहित्य होय. साहित्यातून समाज जागृतीचे काम होते. इंग्रजी भाषेच्या जंजाळ्यात आपली मराठी भाषा व मातीचा विसर पडत आहे. समाजातील प्रदूषण थांबविण्याचे काम साहित्य संमेलनातून होत आहे. स्वार्थी मतलबी राजकारणामुळे राजकारणाला गुन्हेगारीचा साज चढला जात आहे. मोबाईलमुळे जग जवळ आले. पण कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. सुसंस्कृतपणा हा समाजाचा एक चांगला चेहरा आहे. विश्वापलीकडे बघण्याची दृष्टी साहित्यात असते. वाचन संस्कृती गतिमान केली पाहिजे, असे आवाहनही पाटील यांनी केले.
उदघाटक अभिनव कुंभार म्हणाले, साहित्याचा उत्सव कसा असावा याचा परिपाठ या साहित्य संमेलनाने घालून दिला आहे. ग्रामीण व शहरी भागातून अशी साहित्य संमेलने झाल्यास मराठी भाषा व संस्कृतीला चांगले दिवस येतील. कथा व कादंबरी बरोबरच साहित्यात एक चित्रकार दडलेला असतो. राजकिय वातावरण आज प्रदुषित झाल्याने सामाजिक स्वास्थ बिघडत आहे. एकोपा व एकात्मता वाढीची जबाबदारी आता साहित्य संमेलनावर येवुन राहीली आहे.
याप्रसंगी आमदार प्रकाश हुक्केरी यांनी मनोगत व्यक्त केले.
आयकर आयुक्त अभिनय कुंभार यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन झाले. सरस्वती प्रतिमा पूजन, दत्त साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन अरुण देसाई यांच्या हस्ते, तर ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांच्या हस्ते व्यासपीठ उद्घाटन तर मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले.
प्रारंभी कारदगा ग्रामपंचायत अध्यक्षा सुजाता वडर यांनी स्वागत तर प्रास्ताविक अध्यक्ष प्रकाश काशीद यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सुचित बुडके यांनी करुन दिला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे यांच्या ‘खेळ हा जीवनाचा’ व प्रकाश काशीद संपादित ‘पद्मरत्न’ दिवाळी अंक तसेच डॉ. अच्युत माने यांच्या ‘जीवनसृष्टी’ या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संमेलन अध्यक्ष दि. बा. पाटील व मान्यवरांच्या हस्ते झाला. कल्पना रायजाधव यांनी सूत्रसंचालन केले.
संमेलनास माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हवले, डॉ. अभिनंदन मुराबट्टे, अरविंद खराडे, डॉ. बी. ए. माने, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे, अच्युत माने, राजू खिचडे, साहित्यिक महादेव मोरे, इंद्रजित पाटील, आप्पासाहेब पाटील यांच्यासह साहित्य मंडळाचे पदाधिकारी व श्रोते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta