राजू पोवार : विधानसभेला घरावर घालण्यासाठी मोर्चा रवाना
निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील उसाला कारखाने आणि सरकारने प्रतिटन ५५०० रुपये दिले पाहिजेत. याशिवाय यापूर्वी सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे गतवर्षीच्या ऊसाला १५० रुपये प्रतिटन दिले पाहिजे. शिवाय महापूर आणि अतिवृष्टी काळात झालेल्या पिकांचा निपक्षपतीपणे सर्वे करून नुकसान भरपाई मिळावी. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी यापुढील काळात निरंतरपणे कार्यरत राहणार असून भविष्यात कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असेही राजू पोवार यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत संघटनेतर्फे गुरुवारी (ता.७) सकाळी १० वाजता मोर्चा काढून येथील तहसीलदार कार्यालयाला निवेदन देऊन मोर्चाने कार्यकर्ते व शेतकरी विधानसभेला घेराओ घालण्यासाठी रवाना झाले.
तहसीलदार कार्यालयातील अधिकारी मृत्युंजय डंगी यांनी निवेदन स्वीकारून आपल्या मागण्या वरिष्ठाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.
रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार म्हणाले, कर्नाटकात कमी-अधिक प्रमाणात दुष्काळामुळे शेतकऱ्यांचा जीव हादरला आहे. सरकार आणि कारखान्यांनी ऊसाला प्रतिटन ५५०० रुपये द्यावे. विजेमुळे शेतात शॉर्टसर्किट होऊन अनेक शेतकऱ्यांचे ऊसाचे पीक जळून नष्ट झाले आहे. त्याची नुकसान भरपाई तात्काळ द्यावी. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यासाठी कर्जमाफी करून बँकांच्या वसुलीला स्थगिती द्यावी. स्वामीनाथ आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करावी. शेतकऱ्यांना पिकाला पाणीपुरवठा करण्यासाठी निरंतरपणे वीज पुरवठा करावा. शेतकऱ्यांच्या या महिन्याप्रमाणे झाल्यास रयत संघटनेतर्फे लढा तीव्र केला जाईल असा इशारा राजू पोवार यांनी दिला.
यावेळी मधुकर पाटील, मयूर पोवार, आत्माराम राऊत, बजरंग पाटील, एकनाथ सादळकर, बाबासाहेब सूर्यवंशी, सुभाष खोत, शिवाजी वाडेकर, मारुती लाड, संजय नाईक, नामदेव साळुंखे, कुमार पाटील, विजय मंगावते, चिनू कुळवमोडे, चेतन पाटील, विलास पाटील, अण्णाप्पा बन्ने, सागर हवले, पायगोंडा पाटील, राजू पाटील, रोहन नलवडे, सागर पाटील, दादासाहेब चौगुले, सरदार गायकवाड यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.