माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर : निपाणीत बैठक
निपाणी (वार्ता) : शहराच्या लकडी पुलापासून १०० एकर जागेत नव्या तलाव निर्मितीचा प्रस्ताव आहे. यासाठी १७५ कोटी रुपयांची आवश्यकता असून हा प्रस्ताव पालकमंत्री सतीश जारकीहोळी, माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री वीरकुमार पाटील व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्या नेतृत्वाखाली दिला होता. या योजनेला पालकमंत्री जारकीहोळी यांनी तात्काळ हिरवा कंदील दिला आहे. लवकरच सर्वे होऊन या कामाला प्रारंभ होईल. त्यामुळे निपाणीचा पाणी प्रश्न कायमचा निकालात निघेल असा आशावाद माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी व्यक्त केला. शनिवारी (ता.९) दुपारी आपल्या कार्यालयात विरोधी गट नगरसेवकांच्या बैठकीत ते बोलत होते.
गाडीवडुर म्हणाले, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची ही भेट दोन दिवसात होणार आहे. याशिवाय राज्याचे पाटबंधारे मंत्री भोसराज यांना निधी मंजूर करण्याबाबतचे पत्र सतीश जारकिहोळी यांनी पाठवले आहे. या संदर्भात चर्चा करून हा निधी मंजूर होणार आहे. २००१-२ मध्ये तत्कालीन आमदार काकासाहेब पाटील, मंत्री वीरकुमार पाटील यांनी काळम्मावाडी करार केला. याचा शहर व तालुक्याला लाभ झाला आहे. मात्र शहर व परिसराचा विस्तार वाढून पाण्याचा वापर वाढल्यामुळे २०१८ नंतर निपाणी शहराला पाणी टंचाई जाणवत आहे. गेल्या सरकारच्या कार्यकाळात विद्यमान आमदार, खासदार भाजपचे आणि नगरपालिकाही भाजपच्या ताब्यात होती. पण त्यांनी पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढला नाही. निपाणी शहरासाठी पाण्याचे पुढील ५० वर्षांचे नियोजन करणे आवश्यक असून यासाठी आणखी एका तलाव निर्मितीचा प्रस्ताव तयार करून त्याची माहिती पालकमंत्र्यांना दिली आहे. त्यांनी या कामासाठी आपण प्रयत्नशील असून लवकरच नेते मंडळी एकत्र येऊन त्या कामाला प्रारंभ करणार आहेत. नवीन तलाव यांनी केला पालकमंत्र्यांनी संमती दर्शविल्याने निपाणीचा पाणी प्रश्न संपुष्टात येणार आहे.
मंजूर झालेल्या निधीतून तलावाची निर्मिती आणि २५ कोटी रुपयांच्या निधीतून जलशुद्धीकरण केंद्र आणि जलवाहिनी व्यवस्था अशा प्रकारे १७५ कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे. याशिवाय तलाव परिसरात नवीन वीज योजनेचा प्रस्ताव आहे. त्यालाही मंजुरी मिळवून आणून वीज आणि पाण्याची समस्या निकालात काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक रवींद्र शिंदे, बाळासाहेब देसाई सरकार, शौकत मनेर, दत्ता नाईक, डॉ. जसराज गिरे, संजय पावले, शेरू बडेघर, अनिता पठाडे, दिलीप पठाडे, दीपक सावंत, सुनील शेलार, विशाल गिरी, अनिता पठाडे, अनिस मुल्ला यांच्यासह विरोधी गटाचे नगरसेवक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta