
आई-वडिलांच्या कष्टाचे केले चीज
निपाणी (वार्ता) : परिस्थितीची जाण, आई-वडिलांचे कष्ट, शिक्षणाच्या आवडीतून मिळवलेल्या यश आकाशाला गवसणी घालणारे ठरले आहे. जिद्द, चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर बोरगाव येथील टपरी चालकाच्या मुलाने एमबीबीएस पदवी मिळवून सैन्य दलात मेडिकल ऑफिसर म्हणून निवड झालेल्या करण महाजन याने आई-वडिलांच्या कष्टातून यशाचे तोरण बांधले आहे.
बोरगाव येथील सुपुत्र करण मोहन महाजन याची अरुणाचल प्रदेश येथे भारतीय सैन्य दल मधील सीमा सुरक्षा दलातील प्रोजेक्ट अरुणांक येथे मेडिकल ऑफिसर म्हणून निवड झाली आहे.
करण यांचे वडील मोहन महाजन हे बोरगाव बस स्थानकात पानपट्टी चालवितात. जेमतेम शेती व पानपट्टीतून त्यांनी आपला संसाराचा गाडा चालवीत असताना मुलांना उच्च शिक्षण दिले. आई-वडील घेत असल्याचे कष्टाची जाणीव ठेवून करण याने बारावी परीक्षेत कठोर परिश्रम घेऊन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. नंतर त्याला चामराजनगर येथील वैद्यकीय विज्ञान संस्थेत एमबीबीएससाठी प्रवेश मिळाला. त्याने चांगले गुण मिळवून एमबीबीएस पदवी मिळवली. त्यानंतर कारदगा येथे साडेसात महिने प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर दिल्ली येथील आर अँड आर आर्मी सैन्य दवाखान्यात ऑफिसर पदासाठी परीक्षा देऊन मेरिट लिस्टमध्ये त्याची निवड झाली. प्रथम त्यांची मध्य प्रदेश येथील सागर मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ऑफिसर म्हणून निवड झाली. त्यानंतर कामगारी पाहून सैन्य दलाकडून सध्या अरुणाचल प्रदेश येथील सीमा सुरक्षा दलाच्या प्रोजेक्ट अरुणांक येथे त्यांची रेजिमेंटल मेडिकल ऑफिसर म्हणून निवड करण्यात आली आहे.
—————————————————————
‘माझ्या शिक्षणासाठी आई-वडील घेत असलेले कष्ट पाहून मी एमबीबीएस पदवी मिळवली. घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी करणार आहे. आजच्या युवकांनी देशसेवा करण्यासाठी प्रयत्न करावे. माझ्या यशासाठी सर्वांचेच सहकार्य, आई वडिलांचे कष्ट मोलाचे ठरले आहेत.’
– करण महाजन, बोरगाव
Belgaum Varta Belgaum Varta