
माणकापूर यंत्रमागधारकांचा इशारा
निपाणी (वार्ता) : राज्यात नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांची वीज बिले माफ केली आहेत. मात्र यंत्रमागधारकांचे वीज बिल वाढवण्यात आल्याने यंत्रमाग व्यवसाय मात्र अडचणीत आला आहे. याबाबत सरकारला बऱ्याचदा निवेदने देऊनही शासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसाच्या आत वाढीव विज बिल मागे न घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा मानकापूर येथील दरवाढ विरोधी कारखानदार पदाधिकाऱ्यांनी दिला. माणकापूर येथे आयोजित बैठकीत हा इशारा देण्यात आला.
बबन माळी म्हणाले, कर्नाटक राज्यात वस्त्र उद्योग खात्याकडून मिळणाऱ्या सवलतीकडे पाहून आम्ही या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून यंत्रमाग व्यवसाय उभा केला आहे. सध्या शासनाकडून सर्व सबसिडी व अनुदान बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे यंत्रमाग धारक अडचणीत आहेत. असे असताना वाढीव बिलाचा
भुर्दंड घातल्यामुळे कारखाने बंद करण्याचे वेळ आली आहे.
पूर्वी १ रुपये २५ पैसे येणाऱ्या वीजबिलाची सध्या ९ रुपये ७५ प्रमाणे आकारणी केली जात आहे. त्यामुळे बिलात वाढ झाली आहे. या व्यवसायाला उर्जितअवस्था देण्यासाठी शासनाने वीज बिलात सवलत देणे गरजेचे आहे. या व्यवसायात सुमारे ९७ कारखानदार लाखो रुपयांचा गुंतवणूक केले आहे. वीस एचपी यंत्रमाग धारकांना वाढीव बिल देण्यात येत आहे. या सर्वांना उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने वाढीव वीज बिल मागे घेऊन आपणाला वीज बिलात सवलती द्याव्या अशी मागणी केली.
बबन जामदार म्हणाले, पूर्वी येथील सर्वच यंत्रमाग कामगार जवळच्या इचलकरंजीस कामाला जात होते. पण येथील राज्य शासनाकडून मिळणाऱ्या सवलतीचा विचार करून याच ठिकाणी आपण कारखाने उभारणे केली व या ठिकाणी सुमारे ५०० अधिक कामगार काम पण सध्याची परिस्थिती पाहिल्यास वस्त्रोद्योग व्यवसायाला घरघर लागली आहे. कारण या व्यवसायाला मिळणाऱ्या सर्व सोयीसुविधा शासनाने बंद केली आहे. या सर्व योजना चालू कराव्यात म्हणून आपण गेल्या अनेक महिन्यापासून सरकारला निवेदन दिले प्रसंगी बेंगळूर वारी झाली पण अद्याप याकडे कुणीच लक्ष दिले नाही. आधीच अडचणीत सापडलेला यंत्रमागधारक पुन्हा या आर्थिक बोजाने आत्महत्या करू पाहत आहे. याबाबत सरकारला वारंवार माहिती देऊनही याकडे विलक्षण दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे वाढीव वीज बिल मागे घ्यावे अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा बबन जामदार यांनी दिली.
राजू माळी, सन्मती पाटील, जयसिंग लोंढे, जयपाल चौगुले, दीपक माळी, सुधीर कांबळे, अमोल कोळी, अमर माने, बंडू चावरे, आप्पा मोरे, चन्नप्पा पुजारी, संजू अकोळे, रावसाहेब मोरे, शंकर कुंभार, विक्रम माळी, यांच्यासह कारखानदार उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta