निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय उत्कृष्ट सेवा पुरस्कार मिळाला आहे. बेळगाव येथील एका कार्यक्रमात पालकमंत्री सतीश जारकीहोळी, जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील व मान्यवरांच्या हस्ते आरोग्य अधिकारी डॉ. ए. एस. मुजावर यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यानिमित्त विविध संघ, संस्था, ग्रामपंचायत आणि बेनाडी ग्रामस्थातर्फे डॉ. मुजावर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. अशोक पाटील (अमरगोंडा) व सहकाऱ्यांतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी निपाणी समाधी मठातील प्राणलिंग स्वामी व मान्यवरांच्या हस्ते डॉ. मुजावर यांना गौरविण्यात आले. ग्रामपंचायततर्फे अध्यक्ष सत्याप्पा हजारे, उपाध्यक्षा मयुरी मंगावते यांच्या हस्ते सत्कार झाला.
प्राणलिंग स्वामी यांनी, येथील आरोग्य केंद्रा मध्ये परिसरातील अनेक गावातील रुग्णसेवा होत आहे. आरोग्य अधिकारी डॉ. मुजावर यांनी कर्तव्यदक्ष राहून रुग्णसेवा करीत असल्याने आरोग्य केंद्राला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याचे सांगितले. डॉ. मुजावर यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य शहाजी पाटील, प्रभाकर मधाळे, राजू पाटील- भिवशीकर, रविराज पाटील, रमेश पाटील, डॉ. विश्वनाथ दिवटे, अशोक पाटील, रावसाहेब जनवाडे, मुख्याध्यापक आर. एस. जोडट्टी यांच्यासह विविध संघ संस्थांचे पदाधिकारी आणि आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.