माजी मंत्री वीरकुमार पाटील यांची मागणी : मुख्यमंत्र्यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : राज्यात जैन धर्मियांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे राज्य सरकारने ज्याप्रमाणे विविध जातीधर्मांसाठी स्वतंत्र महामंडळे स्थापन केली आहेत त्याच धर्तीवर जैन धर्मियांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केली.
मंगळवारी पाटील यांनी बेंगळूर येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनात, जैन समाज हा अहिंसा तत्त्वांचे पालन करणारा आहे. शांत आणि सहिष्णू असणाऱ्या या समाजाच्या मुनींवर गेल्या काही वर्षात हल्ले होत असून ही दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे जैन माताजी आणि मुनींना राज्य सरकारतर्फे सुरक्षा पुरवावी. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्यांक म्हणून जैन समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल निर्मिती करावी तसेच जैन समाजबांधवांना राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी स्वतंत्र जैन महामंडळ स्थापन करावे, अशा मागण्या निवेदनाद्वारे केल्या.
निवेदन स्वीकारल्यानंतर या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले. याप्रसंगी मंत्री डी. सुधाकर, डॉ. एन. ए. मगदूम- अंकली, सुनील हनमन्नावर यांच्यासह कर्नाटक जैन असोसिएशनचे पदाधिकारी, संचालक व समाज बांधव उपस्थित होते.