महाशिवरात्री निमित्त आयोजन
निपाणी (वार्ता) : जीवन सुंदर निश्चित असा कोणताही फॉर्मुला नाही. परंतु आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घेतला तर जीवन सुंदर होते, असे मत युवा व्याख्याते गणेश शिंदे यांनी व्यक्त केले. येथील महादेव गल्लीतील महादेव मंदिरात आयोजित महाशिवरात्री निमित्त व्याख्यानात ते बोलत होते.
शिंदे म्हणाले, आत्म्याशी जे संबंधित आहे, त्याला सुख म्हणावे, असे ज्ञानेश्वर माउली म्हणतात.परंतु आपण भौतिक साधनांमध्ये सुख शोधतो. सौंदर्यप्रसाधने, खूप मार्क्स, मोठा, पगार, मोठा
बंगला म्हणजे सुंदर जगणे नाही. सध्याची पिढी खूप बुद्धिमान आहे. परंतु दुसऱ्याचे ऐकण्यात तिला स्वारस्य नाही. १ ते ११ वयोगटातील मुलांचे डोळे मोबाईलमुळे व्याधीग्रस्त झाले आहेत. आईच्या स्पर्शापेक्षा लहान मूल मोबाईलच्या सान्निध्यात शांत
राहत आहे. हा मातृत्वाचा पराजय आहे. केवळ नोकरी मिळविणे हाच शिक्षणाचा उद्देश उरला आहे. आपला ध्येयापर्यंतचा प्रवास जीवनातील लहानसहान गोष्टींचा आनंद घेत पूर्ण झाला पाहिजे. निसर्ग हा आपण देतो, त्याच्या कित्येक पटीने आपल्याला परत देत असतो. त्यामुळे ज्या दिवशी आपल्याला मदत करणाऱ्यांच्या यादीपेक्षा आपण मदत केलेल्यांची यादी मोठी होईल. तेव्हाच आपले जीवन सुंदर होईल. पैसा जरूर कमवा पण तो सत्कार्यासाठी खर्च करण्याचे आवाहन शिंदे यांनी केले.
कार्यक्रमास महादेव उत्सव यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुनील पाटील, रवींद्र कोठीवाले, अमर बागेवाडी, समीर बागेवाडी, मलिकार्जुन गडकरी, रवींद्र शेट्टी, संजय मोळवाडे, बाबासाहेब चंद्रकुडे , रवींद्र चंद्रकुडे, डॉ. महेश ऐनापुरे, बाबासाहेब साजन्नावर यांच्यासह रथोत्सव कमिटीचे पदाधिकारी सदस्य व नागरिक उपस्थित होते.