डॉ. जे.पी. कांबळे; कुर्ली हायस्कूलमध्ये सदिच्छा समारंभ
निपाणी (वार्ता) : जीवन ही एक स्पर्धा असून अनेक परीक्षांना आपणास सामोरे जावे लागते. तणावमुक्त वातावरणात परीक्षांना सामोरे गेल्यास यशाचे शिखर गाठता येते. त्यासाठी स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवा, गती आणि मती शाबूत ठेवून कष्ट केल्यास यश हमखास मिळते. ग्रामीण भागातील मराठी माध्यमाच्या शाळेत अनेक जण शिकले आहेत. स्वतःला कमी समजू नका. खरी जडणघडण ग्रामीण भागातील मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळेतच होते. खरी गुणवत्ता आकारास येते, असे मत वाळवा येथील डॉ. जे. पी. कांबळे यांनी व्यक्त केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात आयोजित दहावीसाठी सदिच्छा समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एस. चौगुले हे होते.
टी. एम. यादव यांनी स्वागत केले.
मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ. जे. पी. कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. एस. ए. पाटील, ए. ए. चौगुले, सानिका माळी, शिवानी राऊत, तन्वी कमते, केदार मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले. इमारत बांधकामासाठी दहावीच्या विद्यार्थी व पालक यांनी ८० हजार रुपये व डॉ. जे. पी. कांबळे यांनी १० हजार रुपये देणगी मुख्याध्यापक एस. एस. चौगुले यांच्याकडे सुपूर्द केली.
यावेळी स्कूल कमिटी सदस्य अरुण निकाडे, वकील संजय शिंत्रे, अशोक माने -कागल, सदानंद कांबळे-मत्तीवडे, यांच्यासह विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. एस. एस. साळवी यांनी सूत्रसंचालन केले. के. ए. नाईक यांनी आभार मानले.