निपाणी (वार्ता) : विविध वाद्यांचा गजर आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषात येथील महादेव गल्लीतील शेकडो वर्षांची परंपरा असलेला महादेवाचा रथोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. रथोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
महादेव मंदिरासमोर श्रीमंत दादाराजे देसाई- निपाणीकर सरकार, युवराज सिद्धोजीराजे देसाई- सरकार व बसवराज चंद्रकुडे यांच्या हस्ते पूजा करून रथोत्साचे उद्घाटन झाले.
आमदार शशिकला जोल्ले, माजी आमदार काकासाहेब पाटील, प्रा. सुभाष जोशी, बोरगाव येथील सहकारत्न उत्तम पाटील, व्हीएसएमचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, माजी सभापती सुनील पाटील, चंद्रकांत तारळे, अमर बागेवाडी, नगरसेविका गीता पाटील, सोनल उपाध्ये यांची प्रमुख उपस्थिती होती.
रथाला नारळ वाढविणे, कापूर लावणे, चवरी धरणे, हार घालणे, नारळ देणे, उत्सवमूर्ती घेऊन खाली उतरणे, जंगटी वाजविणे, दिवटी धरणे, रथाला पार लावणे, हत्ती, घोड्यावर बसणे असे विविध सवाल झाले. मिरवणुकीत हत्ती, घोडे, जमखंडी, सांगली, बेडकिहाळ, कैंपट्टीतील बंड, करोशी, याद्यानवाडी, धुळगणवाडीतील करडीढोल व बँडपथकांचा समावेश होता.
मिरवणूकीत कन्नड, मराठी, हिंदी भावगीत, भक्तिगीतांना भाविकांनी दाद दिली. रथोत्सव मार्गावर साखर, कापूर, खारीक, खोबऱ्याचा नैवेद्य दाखविला.
भाविक रथाला तोरण बांधून नवस फेडताना दिसत होते. दोरखंडाने रथ ओढण्यासाठी भाविक गर्दी करत होते. गांधी चौकात रथ आल्यानंतर भाविकांनी अलोट गर्दी केली. मिरवणूक गांधीचौक, गुरुवारपेठ, कोठीवाले कॉर्नर, जुने बसवेश्वर चौक पोलिस ठाण्यामार्गे रात्री उशिरा महादेव मंदिरात पोचली.
यावेळी नगराध्यक्ष जयवंत भाटले, सभापती राजू गुंदेशा, रवींद्र चंद्रकुडे, पप्पू पाटील, संजय मोळवाडे, वीरू तारळे, गजेंद्र तारळे, रवींद्र शेट्टी, सदाशिव चंद्रकुडे, केएलईचे संचालक अमर बागेवाडी, समीर बागेवाडी, मल्लिकार्जुन गडकरी, महेश दुमाले, महालिंगेश कोठीवाले, गजानन वसेदार, डॉ. महेश ऐनापुरे, दयानंद कोठीवाले, रवींद्र कोठीवाले यांच्यासह भाविक उपस्थित होते.
——————————————————————-
बुधवारी विविध शर्यती
महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी (ता.१३) सायंकाळी चार वाजता हालसिद्धनाथ मंदिराजवळ जनरल घोडागाडी शर्यत, खुला नवतर घोडागाडी शर्यत, एक्का घोडागाडी शर्यत आणि हातात कासरा धरून बैल पळविण्याच्या शर्यती होणार आहेत.
——————————————————————–
गुरुवारी महाप्रसाद
गुरुवारी (ता. १४) दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष सुनील पाटील यांनी केले आहे.