
निपाणी (वार्ता) : लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर बोरगाव सर्कल येथे तालुका प्रशासन व पोलीस खात्यातर्फे चेकपोस्ट उभारणी करण्यात आली असून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
निवडणूक काळात पैसे, भेट वस्तू, मद्याची गैर वाहतूक होऊ नये. या वाहतुकीवर नजर असावी. यासाठी या ठिकाणी चेक पोस्ट उभारण्यात आला आहे. बोरगावसह जिल्ह्यात ६४ चेक पोस्टाची निर्माण केली आहेत. तेथे २४ तास पोलीस सेक्टर अधिकारी व महसूल खात्याचे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत.
बोरगाव सर्कलवररील चेक पोस्टवर नोडल, पोलीस, नगरपंचायत, ग्रामपंचायत अधिकारी, कॅमेरा मॅन, सहाय्यक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. लवकरच या ठिकाणी सी.सी. टीव्ही कॅमेराही बसविण्यात येणार आहेत.
रोख ५० हजाराच्या वर रोकड सापडल्यास तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळवावे, असे नियम आहेत. याशिवाय बँकांच्या आर्थिक व्यवहारवरही अधिकाऱ्यांनी नजर ठेवली आहे.
बोरगाव पासून ३ किलोमीटर अंतरावर महाराष्ट्र राज्याची खाद्य सुरू होते. या ठिकाणीही कोल्हापूर जिल्हा पोलिसांतर्फे महाराष्ट्र राज्यातही चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत. या ठिकाणीही कर्नाटक राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करणाऱ्या सर्वच वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या वाहनांचीही तपासणी करण्यात येत आहे. बोरगाव सर्कलावरून मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत असते. अधिकाऱ्यांची संख्या वाढली तर होणारी अवैद्य वाहतूकही बंद होणार आहे.
—————————————————————–
चेकपोस्टवर सुविधा पुरवाव्यात
बोरगाव सर्कलावर जिल्हा प्रशासनतर्फे चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी कोणत्याही सुविधा नाहीत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणाचे वाहतूक होत असल्याने धूळ येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना याचा त्रास होत आहे. यासाठी प्रशासनाने पिण्याचे पाणी, आसन व्यवस्थेसह इतर सुविधा पुरवण्याची मागणी होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta