शिक्षक नामदेव चौगुले यांचा उपक्रम
निपाणी (वार्ता) : येथील रहिवासी आणि अर्जुनी येथील शिक्षक नामदेव चौगुले यांनी आपल्या वाढदिनी २५ हजार रुपयांची रोपे लावून पर्यावरण पूरक वाढदिवस साजरा केला. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. प्रमुख पाहुणे म्हणून येथील अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रशांत अथणी उपस्थित होते.
येथील विश्वकर्मा अभिवृद्धी संघ, लेटेक्स कॉलनी येथे वाढदिवसाचे औचित्य साधून नामदेव चौगुले, पत्नी अपूर्वा चौगुले व पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या हस्ते औदुंबरचे रोप लावून वृक्षारोपणचे उद्घाटन झाले. डॉ.अथणी यांनी, नामदेव चौगुले हे उपक्रमशील व पर्यावरण प्रेमी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी विविध ठिकाणी वृक्षारोपण करून समाजात वेगळा आदर्श निर्माण केला आहे. अशाच प्रकारचे कार्यक्रम करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आवाहन केले.
यावेळी सृष्टी पर्यावरणवादी संघटनेचे संस्थापक फिरोज चाऊस, राजकुमार मेस्त्री, हिंदुस्तान लेटेक्सचे निवृत्त अधिकारी सुधीर गंगाधर, विश्वकर्मा अभिवृद्धीचे अध्यक्ष प्रकाश सुतार, संजय सुतार, प्राची गोरे-चौगुले, वासंती सुतार, स्वराज पोटे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. अपूर्वा चौगुले यांनी आभार मानले.