माजी आमदार काकासाहेब पाटील यांचा सवाल
निपाणी (वार्ता) : हुबळी येथील एका नामांकित विद्यालयात शिक्षण घेत असणाऱ्या नेहा निरंजन हिरेमठ हिची हत्या करण्यात आली. याप्रकरणी काँग्रेसने निषेध व्यक्त करून दोषीवर कारवाईची मागणी केली आहे. तर या प्रकरणावर भाजप नेते मंडळी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी आकांत तांडव केले. शिवाय मेणबत्ती मोर्चा काढला. मग महिलांचा लैंगिक छळ करून अश्लील चित्रफीत काढून फरार होऊनही निधर्मी जनता दलाचे खासदार प्रज्वल रेवाण्णा यांच्याबाबत येथील विद्यमान आमदारांचे मौन का, असा सवाल माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी केला. मंगळवारी (ता.३०) सकाळी काँग्रेस कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
काकासाहेब पाटील म्हणाले, भाजपने धर्मनिरपेक्ष जनता दलाबरोबर आघाडी करून प्रज्वल रेवाण्णा यांना उमेदवारी दिली. आता त्यांचे कारनामे उघडकीस येत आहेत. असे असताना स्थानिक आमदारांनी मात्र मौन पाळले आहे. सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी सुरू करावी.
माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी, नेहा हिरेमठ हिची हत्या झाल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी शहरातून मेणबत्ती मोर्चा काढला. आता रेवण्णा यांनी एकापेक्षा अधिक महिलांची अश्लील चित्रफित काढली आहे. त्यामुळे आता मेणबत्ती मोर्चा काढणारे लोकप्रतिनिधी मशाल मोर्चा काढणार का? अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जलद गती न्यायालयात हे प्रकरण हाताळले पाहिजे. त्यामध्ये दिवशी आढळणाऱ्या वर तात्काळ कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी टाऊन प्लॅनिंगचे अध्यक्ष संयोगित उर्फ निकु पाटील उपस्थित होते.