फसवणुकीमुळे वाहन मालकांचा पवित्रा
कोगनोळी : ऊस गळीत हंगामात बाहेरच्या टोळ्यांकडून फसवणुकीचे प्रकार काय नवीन नाहीत. परंतु त्याला पर्याय म्हणून मुकादम अथवा वाहन मालकांनी स्थानिक ऊसतोडणी मजुर टोळ्यांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये केवळ फसवणूक होण्याचीच भीती असल्याने स्थानिक मजुरांचे महत्त्व वाढले आहे.
साखर कारखाने प्रामुख्याने परिसरातील सहाचाकी ट्रक, ट्रॅक्टरसह दोन ट्रॉल्या-ट्रॅक्टरसह दीडक्या ट्रॉल्या यांच्या वाहन मालकांकडून दरवर्षी करार करुन घेतात. वाहतूक करार करताना वाहनाशी संलग्न तोडणी टोळी केलेली असणे बंधनकारक असते. करारानंतर वाहनाच्या देखभाल दुरुस्तीसाठी आणि टोळीतील मजुरांना उचल देण्यासाठी साखर कारखान्याकडून वाहन मालकास, बँकेकडून कर्ज घेण्यासाठी हमीपत्र देण्याची तरतूद असते.
ग्रामीण भागातील बरेचसे पशुपालक असलेले अल्पभूधारक शेतकरी व भूमिहीन शेतमजुर स्थानिक ऊस तोडणी टोळ्यांमध्ये सामील होतात. गळीत हंगाम संपेपर्यंत दुभत्या जनावरांना हिरव्या चाऱ्यासाठी ऊसाचे वाडे मिळविणे हा प्रमुख उद्देश यामागे असतो. तथापि अशा पशुपालकांची संख्या सीमित असते. त्यासाठी बऱ्याच वाहनधारकांना बाहेरच्या जिल्हा तसेच राज्यातील तोडणी मजुर टोळ्यांची आपल्या वाहनांशी संलग्न करार करावे लागतात. यामध्ये प्रामुख्याने बीड, जालना, परभणी, उस्मानाबाद, नगर, लातूर, सांगोला, विजापूर येथील मजुरांचा जास्त करुन समावेश असतो.
वाहन मालकांनी १५ ते २० मजुरांच्या टोळीस सुमारे १५ ते २० लाख रुपयांची उचल द्यावी लागते. परंतु गेल्या ५-७ वर्षांत बऱ्याच बाहेरच्या टोळी मुकादम व मजुरांनी उचल घेऊन कामावर न येणे, हंगाम संपण्यापूर्वी पळून जाणे, टोळीचा थांग पत्ताच न लागणे अशा क्लृप्त्यांद्वारे बऱ्याच वाहन मालकांची आर्थिक फसवणूक केली आहे. म्हणूनच स्थानिक मजुरांची पसंती वाढली आहे. म्हणूनच मुकादम अथवा वाहन मालकांना स्थानिक ऊस तोडणी मजुरांची पसंती वाढली आहे.