निपाणी (वार्ता) : यावर्षी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जनावरांना चारा पाण्याची सोय करण्याची मागणी रयत संघटनेने केली होती. त्यानुसार निपाणी, चिक्कोडी तालुक्यात चारा आणि पाणी बँक शासनातर्फे सुरू करण्यात आले होते. मात्र किरकोळ वळीव पाऊस झाल्यानंतर चारा बँक बंद केल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली होती. त्यामुळे रयत संघटनेने शुक्रवारी (ता.३१) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून चारा बँक सुरू करण्यासाठी निवेदन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ त्याची दखल घेऊन चारा बँक सुरू करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.
यंदा मार्च महिन्यापासूनच चारा आणि पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे जनावरांची उपासमार सुरू झाली होती. त्यामुळे कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चारा आणि पाणी बँक सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार चारा बँकतर्फे शेतकऱ्यांना चारा देण्याची व्यवस्था केली होती. पण आठवडा पूर्वी झालेल्या पावसामुळे शासनाने चारा बँक बंद केल्याने पुन्हा शेतकऱ्यांची अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे संघटनेने मोर्चा काढून पुन्हा चारा बँक सुरू करण्याची मागणी केली. त्याची दखल घेऊन चारा बँक पूर्वत करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
यावेळी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार, चुन्नाप्पा पुजारी, वासू पंढरोळी, आशा एम., आनंद पाच्छापुरे, इराण्णा पाटील, राजू जुटदार, रवींद्र पाच्छापुरे, रमेश मड्डी, राजू डब्ब, शंकर परन्नावर, कुमार बंबलवाडे, गुरु किरण, संगापा मेटगुड यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.