निपाणी विभाग म. ए. युवा समितीची बैठक; मराठीच्या संवर्धनासाठी प्रयत्न
निपाणी (वार्ता) : कोल्हापूर मधील शिवाजी विद्यापीठाने सीमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांना पदवीत्तर शिक्षणामध्ये राखीव जागा व शैक्षणिक शुल्कात सवलत देऊन ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्याचा अनेक विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे. या पुढील काळातही मराठी भाषिकासह महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मराठी भाषेचे संवर्धन करावे असे आवाहन निपाणी विभाग महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या बैठकीत करण्यात आले. आप्पाचीवाडी येथील हालसिद्धनाथ मंदिरात ही बैठक झाली. अध्यक्षस्थानी युवा समिती अध्यक्ष बंडा पाटील होते.
युवा समिती कार्याध्यक्ष अजित पाटील यांनी, महाराष्ट्रात प्रवेश देताना ८६५ गावातील गावातील विद्यार्थ्यांची शहानिशा करून प्रवेश दिला जातो. त्यामध्ये १९५६ नंतर नवीन वाडयावस्त्या तयार झाल्या आहेत. त्या त्यामध्ये नवीन वाडीवस्तीची नावे ८६५ गावांच्या यादीमध्ये नसल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहेत. याची नोंद शिवाजी विद्यापीठाच्या प्रशासनाने घेण्याची मागणी केली.
भाऊसाहेब पाटील यांनी, मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना मराठी भाषेतुन शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या पालकांना मराठी भाषेचे महत्व पटवून सांगितले पाहिजे. सीमाभागाचा मराठी चेहरा जपून त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. मराठी भाषिक लोकांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एकाच झेंड्याखाली अणण्यासाठी ठोस कार्यक्रम हाती घेण्याचे आवाहन केले. हिंदुराव मोरे यांनी,सीमाप्रश्न सुटण्यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करून लढ्यात सामील व्हावे. सीमाभागासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री साहाय्यता निधी देण्याचे जाहीर केले आहे. साहाय्यता निधीसाठी बेळगाव येथील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिफारस पत्र द्यावे लागते. ते सामान्य नागरिकांना शक्य नाही. त्याऐवजी प्रत्येक तालुक्यातील वैद्यकीय साहाय्यता निधीचे काम करणाऱ्या कडे संबंधित तालुक्याची जबाबदारी देण्याची मागणी केली.
आनंदा रणदिवे यांनीही मनोगत व्यक्त केले. निपाणी तालुका घटक समितीची नवीन कार्यकारणी तयार करण्यासाठी युवा समिती मीडिया प्रमुख नेताजी पाटील यांनी प्रस्ताव मांडला. त्याला सर्वांनी अनुमती दिली. मातृभाषेतुन सरकारी कार्यालयातील कागदपत्रे मिळालीच पाहिजेत. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
बैठकीस सुरेश पाटील, बाबुराव पाटील, सुनील पवार, महेश माने यांच्यासह मत्तीवडे, कुर्ली, सौंदलगा, अप्पाचीवाडी, कोगनोळी, निपाणी परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते. गणेश माळी यांनी आभार मानले.