मंगलमुखी समुदायाकडून तहसीलदारांना निवेदन : विविध मागण्यांचा समावेश
निपाणी (वार्ता) : तृतीयपंथी लोकांना शासनाच्या कोणत्याही योजना मिळत नाहीत. त्यामुळे अशा कुटुंबांना जगणे मुश्किल झाले आहे. तरी शासनाने अशा कुटुंबियांसाठी शासकीय योजनेचा लाभ देण्याच्या मागणीचे निवेदन येथील मंगलमूर्ती संघटनेतर्फे तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांना देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी, आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान ओळख पत्र, वैद्यकीय सुविधा यासह घरकुल सुविधेपासून अनेक तृतीयपंथीय वंचित राहून आपले जीवन जगत आहेत. वेळप्रसंगी अनेकांना उपाशीपोटी राहावे लागत आहे. लॉकडाऊन काळात मोठी वाताहात झाली होती. पण शासनाकडून कोणतीच मदत मिळाली नाही.
यासाठी शासनाने त्यांच्या जीवन उद्धाराचा प्रश्न सोडवण्यासाठी व समाजामध्ये एक आदराचे स्थान मिळवून देण्यासाठी त्यांना सरकारी नोकरीमध्ये, अथवा उद्योग धंदा करण्यासाठी शासनाने आर्थिक मदत करावी, असे प्रतिपादन तृतीयपंथी बेळगाव जिल्हा अॅडव्हायझर किरण बेदी यांनी केले.
प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते गुलाबपुष्प देण्यात आले. किरण बेदी म्हणाले, तृतीयपंथी यांचे जीवन खूप हलाखीची असून त्यांना योग्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने महत्वपूर्ण उपाय योजना करणे गरजेचे आहे. कायद्यामध्ये त्यांचे न्याय्य हक्क असून ते सर्वसामान्य तृतीयपंथीय लोकांपर्यंत पोहोचलेले नसून त्याची माहिती देणे गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी मंगलमुखी समुदाय कम्युनिटी बेळगाव जिल्हा निपाणी तालुका हुम्यानिटी फाउंडेशनचे तृतीयपंथी देवदासी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta