कुटुंबीयांनी फोडला हंबरडा ; नागरिकांची गर्दी
निपाणी (वार्ता) : वर्ग मित्रासमवेत काळम्मावाडी धरण क्षेत्रामध्ये पर्यटनासाठी गेलेल्या निपाणी येथील दोन तरुणांचे पाण्यात बुडालेले मृतदेह मंगळवारी (ता.२) सकाळी एनडीआरएफ तुकडीच्या जवानांनी शोधून काढले. प्रतीक प्रकाश पाटील (वय २२) आणि गणेश चंद्रकांत कदम (वय १८ दोघेही रा.आंदोलननगर, निपाणी) अशी मृत झालेल्या युवकांची नावे आहेत. त्यांच्यावर मंगळवारी (ता.२) सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पाटील आणि कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला.
निपाणी येथील १३ युवक एक दिवसाच्या वर्षा पर्यटनासाठी सोमवारी (ता.१) सकाळी खासगी वाहन भाड्याने घेऊन गेले होते. काळम्मावाडी धरणा जवळ आल्याने सर्वांनी आनंद लुटण्याचा प्रयत्न केला. पण पाण्याचा अंदाज न आल्याने डोहात गणेश हा युवक बोलत होता. त्यामुळे बुडणाऱ्या गणेशला वाचण्यासाठी वाहन चालक प्रतीक पाटील हा त्याला बाहेर काढण्यासाठी गेला होता. यावेळी दोघांनी एकमेकांना मिठी मारल्याने दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. या घटनेची माहिती मिळताच वर्ग मित्रांनी आरडा,ओरोड केली. मात्र पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने दोघेही पाण्यातच वाहून गेले.
स्थानिक पाणबुड्यांसह कोल्हापुर येथील जीवरक्षकांना पाचारण करण्यात आले. सोमवारी (ता.१) सायंकाळी ६ पर्यंत शोध घेण्यात आला. मात्र अपयश आल्याने शोध मोहीम थांबवली. मंगळवारी (ता.२) सकाळी एनडीआरएफ जवानांच्या तुकडीसह मयत झालेल्या दोघांच्या कुटुंबियासह वरील नातेवाईकांनी कोल्हापूर येथील आपत्कालीन जीवरक्षक दिनकर कांबळे यांना पाचारण केले.
एनडीआरएफ तुकडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू ठेवून मृतदेह पाण्याबाहेर काढले. सोळांकुर (ता.राधानगरी) येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन झाल्यानंतर दोन्हीही मृतदेह निपाणी येथील कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. दोन्ही मृतदेहांवर सायंकाळी बसवाननगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी काढलेल्या अंत्ययात्रेस आंदोलननगर, प्रगतीनगर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.