विविध स्पर्धा शर्यती रद्द : रांगोळीतून १२ ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती
निपाणी (वार्ता) : येथील महादेव गल्ली येथील पुरातन श्री महादेव मंदीर येथे शनिवारी (ता.२६) फेब्रुवारीपासून गुरुवार (ता.३) मार्चपर्यंत महाशिवरात्रोत्सव व रथोत्सव होणार आहे. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी ३ मार्च रोजी दु. १ वा. रथोत्सव मिरवणूक होणार आहे. यानुसार २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी शिवकिर्तनाने महाशिवरात्री उत्सवास प्रारंभ होणार आहे दररोज सांस्कृतिक कार्यक्रम, पालखी व श्रीवाहन मिरवणूक होणार आहे. १ मार्च रोजी महाशिवरात्री एकादशीनिमित्त भव्य आकर्षक फूलांची सजावट व रांगोळीमधून १२ ज्योतिर्लिंग साकारण्यात येणार आहेत. गुरूवार (ता. ३) रोजी १ वा. श्रीमंत दादाराजे निपाणकर सरकार यांच्या हस्ते भव्य रथोत्सव मिरवणूकीस प्रारंभ होणार आहे. यामध्ये जमखंडी बेडकीहाळ बँड, करोशी, धुळगणवाडी कोथळी, करडी ढोल, हनुमान संभळा वाद्य जमखंडी तसेच हत्ती व घोडे यांचा समावेश असणार आहे. रविवार (ता. ६ मार्च) महाप्रसाद आयोजित करण्यात आल्याची माहिती उत्सव कमिटी अध्यक्ष सुनील पाटील यांनी दिली.
—–
विविध स्पर्धा रद्द
जागतिक कोरोना महामारी संसर्गामुळे यावर्षी सालाबाद होणाऱ्या सायकल, मॅरेथॉन स्पर्धा, बैलगाडी, घोडागाडी, डान्स स्पर्धा व लावणी कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. महाप्रसादासाठी ज्या भक्तांना शिधा दान करावयाच्या आहेत. त्यांनी महादेव मंदिर देवस्थान कमिटीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.