कमिटी पदाधिकारी, मानकऱ्यांची उपस्थिती; बिदागीचे वितरण
निपाणी (वार्ता) : सर्वधर्मियांच्या ऐक्याचे प्रतीक संत बाबामहाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब ऊरूसानिमीत्त विविध ठिकांणाहून दर्गाह मंडपात दाखल झालेल्या मानाच्या फकिरांची गुरुवारी (ता.१७) रवानगी झाली. परंपरेप्रमाणे चव्हाण वारसांच्या हस्ते भंडारखान्याचे साहित्य सुपूर्द करण्यात आले.
उरूस कमिटी अध्यक्ष, नगरसेवक बाळासाहेब सरकार यांनी, सर्वांच्या सहकार्याने ऊरूस शांततेत सुरू आहे. मानाच्या फकीरांनी आपली जबाबदारी पार पाडली असून, ऊरूस कमिटीनेही त्यांचा यथोचित मान-पान केला आहे. आगामी काळात ही परंपरा वाढीस लागण्यासाठी फकीर संप्रदायाने सहकार्य करून निपाणी परिसरात धार्मिक सौहार्द, शांतता, एकोपा कायमपणे रहावा, यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले. त्यानंतर मानाच्या फकिरांनी प्रार्थना केली. यावेळी रमेश देसाई, पृथ्वीराज चव्हाण, संग्रामसिंह देसाई, रणजितसिंह देसाई, राजूबाबा निपाणीकर, संजय माने, विवेक मोकाशी, शरद मळगे, बंडा गंथडे, बाबासाहेब सुतार, सनी साळुंखे, संतोष गंथडे, प्रभाकर पाटील, शरद बुडके, अतिश सुतार, चिरागअली सरगुरू, आप्पा मलंग, गौस मलंग, यासीन जलाली, हसन मलंग, शाबुद्दीन सरगुरु, बाशू मलंग, समीर सरगुरू, सदाशिव डवरी यांच्यासह भाविक उपस्थित होते.
——————————————————————–
भाविकांची गर्दी
तुरबत दर्शनाकरिता गुरुवारी (ता.१७) भाविकांची रीघ लागली होती. दर्गाह परिसरापासून जुना मोटार स्टॅण्डपर्यंत विविध व्यावसायिकांनी थाटलेल्या दुकानांमध्ये खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. दर्गाह मंडपसमोर लागलेल्या उंच पाळण्यांमध्ये बसण्यासाठी महिला युवतींनी गर्दी केली होती.